म. टा. प्रतिनिधी, ठाणे: गेल्या २८ वर्षापासून फरारी असलेल्या ‘टाडा’ तील एका आरोपीला गुन्हे शाखेने (युनिट १) अहमदनगरमधून अटक केली आहे. सिताराम उर्फ बबन खोसे असे या आरोपीचे नाव असून तो आता ६६ वर्ष वयाचा आहे. या आरोपीसह अन्य आरोपींविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात १९९२ मध्ये टाडा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तक्रारदार अरुण मुदलीयार यांना महानगरपालिकेकडून मिळालेली पाचपाखाडी सर्वे नंबर ३२६ मधील मोकळी जागा त्यांनी गणेश सावंत याला खाली करून द्यावी किंवा त्या मोबदल्यात एक लाख ८० हजारांची खंडणी देण्यासाठी आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवला. तसेच दहशत निर्माण करून मुदलीयार यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला आरोपींनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

हा प्रकार १० एप्रिल १९९२ ते ६ ऑक्टोबर १९९२ या कालावधीत घडला असून टाडा अंतर्गत पोलिसांनी कारवाई करत काही आरोपींना अटक केली होती. या गुन्ह्यात बबन खोसे फरार होता. गुन्हे शाखेकडून त्याचा शोध घेण्याचे काम सुरु होते. खोसे अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील दर्यापाडळी गावात राहत असून तो गावी असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील हवालदार रवींद्र काटकर यांना मिळाली होती.

सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश काकड यांचे पथक तात्काळ अहमदनगरला रवाना झाले. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन सोमवारी खोसे याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीमध्ये या गुन्ह्यामध्ये खोसे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेने त्याला नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तब्बल २८ वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला गजाआड केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here