शिवसेना महानगर व महिला आघाडीच्य पदाधिकाऱ्यांनी सकाळी गोलाणी मार्केटच्या तळमजल्यात येवून हे अभिनव आंदोलन केले. यावेळी या साचलेल्या सांडपाण्यात ढोल-ताशाच्या निनादात कागदी नाव व मासे सोडून शिवसेना महानगर व गाळेधारकांकडून आंदोलन करण्यात आले. या पाण्यात सोडण्यात आलेल्या बोटींवर भाजपाचे आमदार, खासदार, महापौर व स्थायी समिती सभापती यांच्या नावाच्या कागदाच्या बोटी करुन त्या सोडण्यात आल्यात. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी साचलेल्या पाण्याचे जलपूजन करीत गांधीगिरी देखील केली.
जळगावातील अत्यंत वर्दळ असलेल्या महापालिकेच्या गोलाणी मार्केटच्या तळमजल्यात अनेक वर्षांपासून सांडपाणी साचत आहे. मार्केटमधील ड्रेनज चोकअप झाल्याने हे पाणी साचत आहे. या पाण्यातून दुर्गंधी येत आहे. यामुळे मार्केटमधील व्यापारी तसेच मार्केटमध्ये रहीवास असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासन व सत्ताधारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी नगरसेवक व सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपातील सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून सांडपाणी साचण्याची समस्या असून उपमहापौर सुनील खडके हे पाहणी दौऱ्यावर असतांना त्यांना याबाबत मंगला बारी यांनी अवगत करून दिले होते. गोलाणी मार्केटच्या पाईप लाईनमध्ये वारंवार घाण पाणी अडकत असते, ती फार जुनी झाली असून ती काढून तेथे नवीन पाईपलाईन बसविण्यात यावी अशी मागणी भंगाळे यांनी केली. तसेच महापालिका प्रशासनाने तत्काळ दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला.
आंदोलनात मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, खुबचंद साहित्या, मंगला बारी, गोलाणी मार्केट शाखेचे अध्यक्ष पूनम राजपूत आदी उपस्थित होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times