म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

पैसे देऊन कृत्रिमरित्या टीआरपी वाढविल्याप्रकरणी रिपब्लिकचे सीईओ यांना अटक केल्यानंतर, पोलिसांनी आपला मोर्चा केबलचालकांकडे वळवला आहे. राज्यभरातील केबलचालकांची झाडाझडती घेण्यास सुरुवात करण्यात आली असून सोमवारी चार जणांचे जबाब नोंदविण्यात आले. या घोटाळ्यात ‘वॉन्टेड’ आरोपी शिवेंद्र मूल्यरकर याचे नातेवाईक आणि ‘डेन’ नेटवर्कचे संचालक राजू गावी यांचाही जबाब घेण्यात आला.

बोगस टीआरपीप्रकरणात मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने आतापर्यंत १३ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये विकास खानचंदानी आणि घनःश्याम सिंग या रिपब्लिकशी थेट संबंध असलेल्या दोघांचा समावेश आहे. खानचंदानी पोलिस कोठडीत असून त्यांच्या चौकशीत महत्त्वपूर्ण माहिती हाती लागल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ६ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासामध्ये काही केबलचालकांची नावे पुढे आली असून या केबल चालकांचे जबाब नोंदविण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

सांगलीच्या साई केबल नेटवर्कचे बाळू बड, सिद्धनाथ केबलचे अमर पाटील, नाशिकच्या रेम्बो डिजिटेकचे विपुर परख, तसेच कोल्हापूरच्या भीमा रिद्धी नेटवर्कच्या वतीने नितीन पंजाबी यांचे जबाब नोंदविण्यात आले. रिपब्लिकचे प्रमुख वितरक घनःश्याम सिंग यांचा कनिष्ठ सहकारी शिवेंद्र मूल्यरकर हा पोलिसांना अद्याप कुठेच सापडला नाही. त्याचे नातेवाईक आणि डेन नेटवर्कचे संचालक राजू गावी यांची याप्रकरणी चौकशी करण्यात आली. आज, मंगळवारीही या सर्वांचे जबाब नोंदविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘फोरेन्सिक ऑडिट’मध्ये ठपका टीआरपी घोटाळ्यामध्ये बऱ्याच तांत्रिक आणि आर्थिक बाबी असल्याने त्या तपासण्यासाठी फोरेन्सिक ऑडिटरची मदत घेण्यात आली. या ऑडिटरनी आपला अहवाल दिला असून यामध्ये रिपब्लिकच्या आर्थिक व्यवहारावर ठपका ठेवण्यात आला आहे. कंपनी सुरू होण्यापूर्वीच टीआरपीप्रमाणे शेअर्सचे दरही कृत्रिमरित्या वाढविल्याचे यात नमूद केले आहे. पुरवणी आरोपपत्रासोबत हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here