म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयात इंग्रजी व हिंदी भाषेबरोबरच मराठी भाषेचा वापर करण्याचा नियम आहे. असे असतानाही आपल्या दैनंदिन वापरात मराठी भाषेला स्थान देत नसल्याचे दिसत आहे. कोकण रेल्वेवरील गाड्यांची माहिती, प्रसिद्धीपत्रके केवळ इंग्रजी भाषेतूनच प्रसिद्ध होत आहेत. याबद्दल मराठी एकीकरण समितीच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यात संवर्धनाचे काम करत असताना मराठीच्या प्रचार-प्रसारासाठी , स्थानिक जिल्हाधिकारी यांना अनेकदा पत्रे पाठवण्यात आली आहेत. तरीदेखील कोकण रेल्वेवरील माहिती मराठीतून उपलब्ध होत नाही. कोकण रेल्वेचे संकेतस्थळही मराठीत नाही. कोकण रेल्वेचा कारभार नवी मुंबईत चालतो, मुख्यालयातच मराठी भाषेची गळचेपी होत आहे, असे मराठी एकीकरण समितीचे उपाध्यक्ष आनंदा पाटील यांनी सांगितले. आनंदा पाटील व अक्षय महापदी यांच्या तक्रारीवरून मराठी राजभाषा विभागाने रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवले आहे.

‘केंद्राच्या राजभाषा विभागाने जून १९७७, जुलै २०१०मध्ये, तर राज्याच्या मराठी भाषा विभागाने डिसेंबर २०१७, नोव्हेंबर २०२०मध्ये शासन परिपत्राकान्वये प्रादेशिक भाषेचा वापर करण्याबाबत रेल्वे बोर्डाला कळवले आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेला माहिती मिळावी, याण्यासाठी कोकण रेल्वेची पत्रके, जाहिराती, फलकांवरील मजकूर इंग्रजी-हिंदीबरोबरच मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात याव्यात,’ असे पत्र २५ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारने कोकण रेल्वेला धाडले आहे. कोकण रेल्वेचा मार्ग राज्यातील तीन जिल्ह्यांमधून जातो. महाराष्ट्राने या प्रकल्पासाठी २२ टक्के इतका आर्थिक भार उचलला आहे. यामुळे महाराष्ट्रातून धावणाऱ्या प्रत्येक गाडीची माहिती ही मराठीतूनच असायला हवी, असेही पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

नियमांनुसार आवश्यक बदल

‘रेल्वे स्थानकांवर मराठीसह इंग्रजी, हिंदी भाषेचा वापर होतो. सरकारी नियमांनुसार कोकण रेल्वेच्या दैनंदिन कामकाजात आवश्यक ते बदल करण्यात येतील,’, असे कोकण रेल्वे जनसंपर्क विभागातील वरिष्ठ अधिकारी गिरीश करंदीकर यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here