वाचा:
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडलं होतं. सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवलं जात आहे. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणीसारखं वातावरण आहे, असं फडणवीस म्हणाले होते. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून फडणवीसांच्या या आरोपाचा समाचार घेण्यात आला आहे. ‘आणीबाणीसंदर्भात फडणवीस यांनी कोणतीही ठोस उदाहरणे समोर आणली नाहीत. पण राज्यातील वातावरण चांगले नाही, असे पालुपद लावलं आहे. खरंतर, महाराष्ट्राइतकं मोकळं वातावरण जगात कुठेच नसेल. स्वतः फडणवीस, , आशीष शेलार यांच्यासारखे प्रमुख पुढारी रोज सरकारच्या विरोधात ‘डीजे’ लावल्याप्रमाणे ठणाणा करीत आहेत. रस्त्यांवर आंदोलन करीत आहेत. वृत्तपत्रांना मुलाखती देऊन खोटे आरोप करीत आहेत. सरकारच्या बदनामीच्या मोहिमा चालवीत आहेत. हे सर्व सुरळीत चालू असताना सरकारी यंत्रणा विरोधकांची मुस्कटदाबी करीत आहे, असे हे लोक कोणत्या तोंडाने सांगतात?,’ असा प्रश्न शिवसेनेनं केला आहे.
वाचा:
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही शिवसेनेनं टीकेचे बाण सोडले आहेत. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फेकूचंद पडळकरांसारखे नेते विधानसभेच्या दारात पारंपरिक ढोल वाजवून सरकारविरोधात नाचगाणे, घोषणाबाजी करीत होते. सर्व वृत्तवाहिन्यांवर त्या ढोलवादनाचे थेट प्रसारण सुरू होते. हुकूमशाही असती तर पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते, पण त्यांना निषेधाचं स्वातंत्र्य दिलं गेलं,’ याकडंही शिवसेनेनं लक्ष वेधलं आहे.
म्हणते…
>> एक वृत्तवाहिनीचा मालक मराठी उद्योजकास आत्महत्या करण्यास भाग पाडतो, हा साधा गुन्हा आहे काय? बाकी त्यानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी, घाणेरड्या भाषेत उल्लेख केला ते तूर्त बाजूला ठेवा. त्याबद्दल भाजपनं त्याचं शाल व श्रीफळ देऊन कौतुक करावं, पण मराठी उद्योजकानं या माणसाच्या दहशतीखाली आत्महत्या केली, त्याचाही कायद्यानं तपास करायचा नाही काय?
>> मुंबईला पाकिस्तान, पोलिसांना माफिया वगैरे बोलणं हे विरोधी पक्षाला मान्य आहे काय? तसं असेल तर या नटीबाईची भाजप कार्यालयात खणा-नारळानं ओटी भरावी! एकदा तुमचे संस्कार व संस्कृती चव्हाट्यावर येऊ द्या.
>> ठाकरे सरकारनं भ्रष्टाचार व अनियमितता याबाबत जुन्या प्रकरणांच्या चौकशीची घोषणा केली. त्यावर विरोधकांनी इतकं हडबडून जायचं कारण नाही. चौकशीला घाबरायचं कारण नाही व हे सर्व सूडाचं राजकारण आहे, असे बोंबलायची गरज नाही.
>> शिवसेनेचे आमदार व त्यांच्या कुटुंबीयांच्या बाबतीत ‘ईडी’सारख्या केंद्रीय संस्था जो छळवाद करीत आहेत त्यावर भाजप पुढाऱ्यांच्या प्रतिक्रिया एकदम हरिश्चंद्री थाटाच्या आहेत, काही चुकीचे केले नसेल तर घाबरायचे कारण काय? असे सल्ले दिले जात आहेत. तेच सल्ले सरकार विरोधकांनाही लागू पडतात.
>> जलयुक्त शिवार योजना, बीएचआर सोसायटी घोटाळा, मुंबै बँक, आधीच्या सरकारची रस्ते कंत्राटे याबाबत व्यवहार चोख असतील तर इतका घाम फुटायचं कारण काय? शेणात तोंड बरबटलं असेल तर कायदा काम करीलच व कायद्यानं काम केलं तर आणीबाणी आली असं बोंबलायचं. हा काय प्रकार आहे?
>> अठरा दिवसांपासून पंजाब-हरयाणाचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतोय. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारणे, अश्रुधूर सोडणे यास आणीबाणीचा कोणता प्रकार मानायचा? हे शेतकरी देशद्रोही आहेत, ते नक्षलवादी आहेत, त्यांना पाकिस्तान-चीनकडून अर्थपुरवठा होतो, असे बोलणे ही आणीबाणीचीच संस्कृती आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times