मुंबई: मनसेच्या भगवीकरणामागे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असल्याच्या भाजपच्या आरोपाला राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात काहीही झालं तरी जातीयवादी पक्षांना सगळीकडे शरद पवार दिसतात. पवारांचं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही, अशी टीका करतानाच भाजपवाले हिंदुत्वाचे मालक आहेत काय? असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला.

मनसेच्या भगवीकरणामागे शरद पवार यांचं डोकं असून हिंदू मतांच्या विभाजन करण्याची पवारांची ही खेळी आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात काहीही झालं तरी त्याचं खापर पवारांवर फोडलं जात असल्याचं मी राजकारणात येण्यापूर्वीपासून पाहत आलो आहे. काही लोक पवार द्वेषाने पछाडलेली आहेत. म्हणूनच या जातीयवादी पक्षांना सर्वत्र पवारच दिसतात. त्यांना पवारांचं नाव घेतल्याशिवाय झोपही लागत नाही, असा हल्ला आव्हाड यांनी चढवला.

मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे. मनसेने काय करायचं हे मनसे ठरवेल. त्यांचे नेते ठरवतील, ते पवार कसे ठरवतील? मनसेने काय भूमिका घ्यायची हे ते ठरवतील. हिंदुत्वाबाबत सांगायचं झालं तर भाजपवाले हिंदुत्वाचे मालक आहेत का? हिंदुत्वाचं सर्टिफिकेट आता नागपूरमधून घ्यावं लागेल का? हिंदू मतं म्हणजे नेमकं काय? आम्हाला काय चंद्रावरची मतं मिळतात का? असा सवालही आव्हाड यांनी केला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे प्रवक्ते राम कदम पक्ष बदलामुळे डिस्टर्ब झाले असून त्यांना काहीही काम उरले नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

गोरेगाव येथे आज मनसेचं अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. पहिल्यांदाच सावरकर यांची प्रतिमा मनसेच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे मनसे हिंदुत्ववादी भूमिका घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मनसेच्या या खेळीमुळे हिंदू मतांची विभागणी होण्याची भीती भाजपला वाटत असल्यामुळेच भाजपने राष्ट्रवादीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here