नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या प्रकरणात पाच आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार बाळ ज बोठे पसार आहे. या प्रकरणात बोठे याचे नाव ३ डिसेंबरला समोर आले. तेव्हापासून तो पसार आहे. पोलिसांची पाच पथके बोठे याचा शोध घेत आहेत. दुसरीकडे त्याच्या विरोधातील पुरावे देखील गोळा केले जात आहेत. आतापर्यंत पोलिसांच्या हाती या हत्या प्रकरणातील महत्वाचे पुरावे आले आहेत.
पोलिसांनी आरोपी बोठेसंदर्भात माहिती देण्याचे नागरिकांना आवाहन केले होते. त्याला देखील प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे आरोपी बोठे याने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसा अर्ज त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात केला होता. या अर्जावर आज न्यायाधीश एम.आर. नातू यांच्या समोर सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. सतीश पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडली. तर, आरोपी बोठे यांच्या वतीने ॲड. महेश तवले यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतले आहेत. आता या प्रकरणात न्यायालय निर्णय केव्हा देते? याकडे लक्ष लागले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times