पुरवणी मागण्यांवर आज विधानसभेत चर्चा सुरु आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार मुद्दे मांडत असताना सभागृहातील सदस्य उत्तर देण्यासाठी उभे राहिले होते. त्याचवेळी सुधीर मुनगंटीवार यांनी त्यावर ‘माझ्या भाषणात अडथळा आणतो तो पुन्हा कधीच जिंकू शकत नाही,’ असा मिश्किल टोला त्यांनी लगावला आहे.
सुधीर मुनगंटीवार यांच्या या टिप्पणींवर अजित पवार यांनी उत्तर देत ‘मी तुमचं आव्हान स्वीकारतो, मला पाडून दाखवा,’ असं म्हणत मुनगंटीवार यांना थेट चॅलेंजचं दिलं आहे. अजित पवारांनी दिलेल्या या आव्हानानंतर सुधीर मुनगंटीवार यांनीही पुढं प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
आज सभागृहात काय घडलं?
आज सभागृहात कंगना राणावत, अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन जोरदार गदारोळ माजला. मुनगंटीवार यांनीही विविध प्रश्नांवरुन ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच, महाविकास आघाडी सरकारला खोचक टोलाही लगावला आहे.
‘मुख्यमंत्री, अजित पवार आणि माझा व देवेंद्र फडणवीस यांचा जन्म जुलै महिन्यातील आहे, जुलै महिन्यातील व्यक्तिमत्वाचे गुण मी पाहिले. त्यात एक वाक्य लिहलंय. आई- वडिलांना त्रास होईल असा कोणताही व्यवहार जुलैमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती करत नाही. तेव्हा माझ्यासमोर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आले. त्याचवेळी मी बाळासाहेब यांचे व्हिडिओ पाहिले, त्यांची भाषणं ऐकली,’ असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times