म.टा.प्रतिनिधी, नगरः नगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर नियुक्ती झाल्यापासून स्थानिक नेत्यांकडून विविध स्थानिक प्रश्नांवरून मंत्री यांच्यावर टीका करीत त्यांना लक्ष केले जात आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या बिबट्याच्या प्रश्नावरून दोनच दिवसापूर्वी माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होता. त्यातच आता भाजपचे नगर जिल्हा परिषदेचे भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनीही गेल्या अकरा महिन्यापासून जिल्हा नियोजन समितीची सभा न झाल्याने मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे.

पालकमंत्री महोदय जिल्हा नियोजन समितीची सभा कधी घेणार? असा प्रश्नच वाकचौरे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व भाजप गटनेते वाकचौरे यांनी जिल्हा नियोजन समितीची सभा नगर जिल्ह्यात गेल्या अकरा महिन्यांपासून झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या ११ महिन्यांपासून समितीची सभा न झाल्याने नगर जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा मंजूर करता आला नाही. जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्याचे, सरकारी इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यांना दुरुस्ती तसेच नवीन इमारती करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती सभा न झाल्याने निधी उपलब्ध नाही. रस्त्यांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झालेली असल्याने जिल्ह्यामध्ये छोटे मोठे अपघात होत आहेत. करोना आजाराचा संसर्ग वाढल्याने अनेक लोकांचे बळी गेले. वास्तविक पाहता जिल्हा नियोजन समितीकडून जिल्ह्याच्या विकासाच्या आराखड्यावर चर्चा होऊन अनेक सरकारी विभागांना निधीचे वितरण केले जाते. परंतु सभा न झाल्याने आरोग्य, शिक्षण, बांधकाम, कृषी, पशुसंवर्धन, नरेगा तसेच इतर विभागांच्या योजना प्रशासनाला राबवता आल्या नाहीत, असा आरोप वाकचौरे यांनी केला असून जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री महोदय कधी घेणार व अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाला चालना कधी देणार? असा सवालही उपस्थित केला आहे.

दरम्यान, आता ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा झाल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या सभेला आचारसंहितेचा अडथळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ही सभा ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच होऊ शकते. मात्र, सभा न झाल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्याने पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावर टीका केली असून त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here