मुंबई मेट्रो- ३चे कारशेड कांजूरमार्गमध्ये उभारण्यासाठी १०२ एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाला मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर, त्या जमिनीवर कोणतेही काम करण्यास एमएमआरडीएला मनाई करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर ठाकरे सरकारला मोठा झटका बसला आहे. मेट्रो कारशेडच्या वादाला नेमकी कधी सुरुवात झाली? व कोणत्या कारणांमुळं हा वाद अधिक वाढत गेला? याचा घेतलेला हा संपूर्ण आढावा

फडणवीस सरकारच्या काळात मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील हजारो झाडे तोडण्यात आली. त्याविरोधात वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. स्थानिकांसह मुंबई आणि परिसरातील नागरिक आणि वृक्षप्रेमींनी आंदोलनही केलं होतं. आरेतील वृक्षतोड प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठानं ७ ऑक्टोबरला आरेतील वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आली होती.

आरेतील वृक्षतोड प्रकरणावरून त्यावेळी सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेनं घडलेल्या प्रकाराचा कडाडून विरोध केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात सत्ताबदल झाला. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. ठाकरे सरकारनं आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षानं यानिर्णयाविरोधात राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. इथेच वादाची पहिली ठिणगी पडली.

आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारने मेट्रोचं कारशेड थेट कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार मेट्रो ३ आणि ६ या प्रकल्पांना एकत्रित केले जाणार आहे. त्यामुळे दोन्ही कॉरिडोरचे कारशेड एकाच ठिकाणी असतील.

कांजूरमार्ग येथे मेट्रोचं कारशेड स्थलांतरित केल्यानंतर एमएमआरडीएनं कामाला सुरूवात देखील केली होती. त्याचदरम्यान केंद्र सरकारने या वादात उडी घेतली व पुन्हा एकदा केंद्र सरकार व राज्य सरकार असा संघर्ष सुरु झाला. केंद्रानं कांजूरमार्ग येथील कारशेडचे काम थांबवण्याच्या सूचना राज्याला देत नवीन वादाला तोंड फोडलं होतं. तसंच, केंद्रानं ही जागा केंद्राच्या मालकीची असल्याचा दावा करत उच्च न्यायालयात धाव होती. त्यावर आज सुनावणी झाली असून कोर्टानं पुन्हा एकदा कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. त्यामुळं मुळे २०२१ मध्ये मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणे अपेक्षित असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

कसा आहे

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावर रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) भुयारी मेट्रोचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पातील सीप्झ ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबर २०२१ पर्यंत, तर दुसरा टप्पा बीकेसी ते कुलाबा जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएमआरसीने ठेवले आहे. दरम्यान, या प्रकल्पातील भुयारीकरणाचे सुमारे ८३-८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, ६० टक्के सिव्हिल वर्क पूर्ण झाले आहे. मात्र कारशेडचे काम पूर्ण होण्यास विलंब लागणार असल्याने इतर कामे पूर्ण झाली तरी प्रकल्प रखडण्याची दाट शक्यता आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here