गोरेगाव येथे नेस्को मैदानावर मनसेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनला संबोधित करताना राज ठाकरे यांची तोफ धडाडली. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो… अशी साद घालतच राज यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसेची भूमिका स्पष्ट केली. मी मराठी आहे आणि हिंदूही आहे. धर्मांतर केलेलं नाही. माझी भाषणं तपासा त्यातही तेच ऐकायला मिळेल. हे काही मी आज बोलत नाही. मराठीला नख लावाल तर मराठी म्हणून अंगावर धावून जाईल आणि माझ्या धर्माला नख लावाल तर हिंदू म्हणून अंगावर धावून जाईल, असा इशारा देतानाच माझा कोणताही वैचारिक गोंधळ नाही. माझे विचार सरळ आणि स्वच्छ आहेत, असं राज म्हणाले.
मशिदीवर भोंगे हवेतच कशाला?
देशाशी प्रामाणिक असलेले मुसलमान आमचेच आहेत. आम्ही माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम, क्रिकेटपटू झहीर खान आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना नाकारू शकत नाही. मात्र इथे कुणी धिंगाणा घातला तर आम्ही आडवे जाणारच, असं सांगतानाच प्रत्येकानं आपला धर्म घरातच ठेवावा. मशिदीवर भोंगे हवेतच कशाला. आमची आरती जर तुम्हाला त्रास देत नसेल तर नमाजचा त्रास का? नमाजाचे पठण जरूर करा. त्यासाठी भोंगे हवेत कशाला? असा सवालही त्यांनी केला. मी हिंदुत्वाबाबत यापूर्वीही अनेकदा बोललो होतो. तेव्हा कुणीही हिंदुत्वाकडे चाललात का म्हणून विचारलं नाही. आता मात्र मला प्रश्न विचारला जातोय. आम्हाला तुम्ही असा प्रश्न का विचारता. आम्हाला आमचा मार्ग माहित आहे, अशा कानपिचक्याही त्यांनी टीकाकारांना लगावल्या.
मोर्चाला मोर्चातून उत्तर देणार
यावेळी राज ठाकरे यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीलाही पाठिंबा दिला. आपला देश म्हणजे एक धर्मशाळा होऊ पाहत आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोर आपल्या देशात मोठ्या संख्येने आहेत. भारतात अनेक मोहल्ले उभे राहिले आहेत. त्यामुळे आतच मोठा धोका निर्माण झाला आहे. उद्या पाकिस्तानसोबत युद्ध झालं तर भारतीय सैन्याला आतल्याच शत्रूंशी आधी लढावे लागेल. त्यामुळे एनआरसीचं नंतर बघू आधी पाकिस्तान सोबतची समझोता एक्सप्रेस आणि बससेवा बंद करा. पाकिस्तान सोबत आपल्याला संबंध हवेतच कशाला, असं सांगतानाच काश्मीर आणि राम मंदिराचा राग काढण्यासाठीच सीएएला विरोध करणारे मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चात आतले आणि बाहेरचे मुसलमान किती होते हे आधी तपासा. या मोर्चांना मोर्चानेच साथ दिली पाहिजे. पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी मुंबईतल्या आझाद मैदानात मनसेच्यावतीने मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चात मोठ्या ताकदीनं सहभागी व्हा, असं आवाहन राज यांनी सैनिकांना केलं.
शहा-ठाकरेंना भेटणार
महाराष्ट्रात अनेक भाग असे आहेत की तिथे पोलिसांना जाता येत नाही. या ठिकाणी देशातील आणि देशाबाहेरील मौलवीच जात असतात. या ठिकाणी काही तरी शिजतंय. या ठिकाणी मोठं कारस्थान घडवण्याचा डाव असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांकडून मला ही माहिती मिळाली आहे. सर्वच तुम्हाला सांगता येणार नाही. त्यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times