वाकडी येथील रहिवासी अमित साहेबराव पाटील हे २०१० मध्ये सीमा सुरक्षा दलात दाखल झाले होते. सध्या ते जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावत होते. आठ दिवसांपूर्वी त्यांच्या अंगावर बर्फाची लादी कोसळली होती. यावेळी त्यांना तात्काळ सैन्य दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठवडाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. शहीद जवान अमित पाटील यांचे कुटुंब शेतकरी असून, सर्वसामान्य परिस्थितीत ते सैन्य भरतीत रुजू झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि लहान भाऊ असा परिवार आहे.
मूळ गावी होणार अंत्यसंस्कार
अमित पाटील यांचे पार्थिव आज रात्री जम्मू-काश्मीर वरून पुणे येथे येणार आहे. त्यानंतर ते चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथे त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप वेळ निश्चित नसल्याची माहिती त्यांच्या परिवाराकडून देण्यात आली.
महिनाभरात गमावला दुसरा जवान
जळगाव जिल्ह्याने महिन्याभरातच दुसरा जवान गमावला आहे. यापूर्वी चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील यश दिगंबर देशमुख या जवानाला जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांशी लढताना हौतात्म्य आले होते. त्यानंतर आता अमित पाटील यांचा अपघाती मृत्यू झाल्याने चाळीसगाव तालुका सुन्न झाला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times