म.टा. प्रतिनिधी, नगरः राजकीय संघर्ष टाळण्यासाठी ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी ‘बक्षीस’ जाहीर केले आहे. ज्या गावांच्या निवडणुका बिनविरोध होतील, त्या गावांतील विकास कामासाठी आपल्या आमदार निधीतून २५ लाख रुपयांचा विकास निधी देण्याची घोषणा लंके यांनी केली आहे.

राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होत आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघातील ११० गावांत ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू असून प्रत्येकालाच आमदारांची मदत हवी आहे. त्यासाठीही अनेक गावांतून प्रयत्न सुरू झाले आहेत.

मात्र, गावातील निवडणुका राजकीय वातावरण खराब करणाऱ्या ठरत असल्याने ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी भूमिका आमदार लंके यांनी मांडली आहे. त्याला पाठिंबा मिळावा यासाठी ज्या गावातील निवडणूक बिनविरोध होईल, त्या गावाला २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणाच लंके यांनी केली आहे. बिनविरोध निवडणुका केलेल्या गावांसाठी हा निधी उपलब्ध करून देऊ, असे त्यांनी जाहीर केले.

आता त्यांच्या या आवाहनाला किती पाठिंबा मिळतो ते लवकरच कळेल. या विधानसभा मतदार संघात नगर आणि पारनेर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. या गावांमध्ये लंके यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. निवडणुकांमुळे त्यांचा अपसांत संघर्ष होण्याची वेळही अनेक ठिकाणी येणार आहे. तो टाळण्यासाठी लंके यांनी बिनविरोध निवडणुकांचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याला काही गावांतून प्रतिसादही मिळू लागला आहे. राजकीय संघर्ष थांबण्यासाठी ग्रामस्थांचाही रेटा आवश्यक आहे. त्यामुळे ही बक्षीस योजना जाहीर करून पुढारी मंडळींवर ग्रामस्थांचा दबाव वाढविण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here