म. टा. प्रतिनिधी, : प्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या तीन आरोपींच्या चौकशीमध्ये नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या अगोदर अवघ्या तीन दिवसांमध्ये एक कोटीच्या बनावट नोटा छापल्या असून धनोत्रयोदशीच्या दिवशी या नोटा विक्रीसाठी बाहेरही काढल्या होत्या. परंतु नोटांची विक्री झाली नाही. विशेष म्हणजे यातील १४ लाखांच्या बनावट नोटा आरोपींनी स्वत:हून विल्हेवाट लावल्या असल्याची बाब चौकशीत समोर आली आहे, असे गुन्हे शाखेच्या वागळे युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांनी सांगितले.

दोन हजार रुपायांच्या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी एक व्यक्ती ठाण्यातील कापुरबावडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या वागळे युनिटने सुरुवातीला सचिन आगरे याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर मन्सुर हुसेन खान आणि चंद्रकांत माने यांना अटक करत एकूण ८५ लाख ४८ हजारांच्या दोन हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. बनावट नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्यही जप्त केले.

खान याच्या घरी नोटा छापण्यात येत असल्याची बाब चौकशीमध्ये निष्पन्न झाली आहे. सध्या तिन्ही आरोपी पोलिस कोठडीमध्ये आहेत. परंतु जुलैमध्ये देखील १२ लाखांच्या बनावट नोटा छापल्या होत्या. या नोटांचा दर्जा तितका चांगला नव्हता. यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारच्या नोटा छापण्यासाठी आरोपींनी अत्याधुनिक प्रिंटर, शाई, कागदाची खरेदी केली.

दिवाळीच्या अगोदर म्हणजे ९, १० आणि ११ नोव्हेंबर रोजी तीन दिवसात तब्बल एक कोटीच्या बनावट नोटांची छपाई केली. आणि धनोत्रयोदशीच्या दिवशी नोटांची आरोपी विक्री देखील करणार होते. मात्र नोटांची विक्री झाली नसल्याची बाब चौकशीमध्ये समोर आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांनी दिली. आरोपींवर यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. परंतु एकूण छापलेल्या नोटांपैकी १० लाखांच्या नोटा आरोपींनी पाण्यात टाकून विल्हेवाट लावल्या. तर अन्य ४ लाखांच्या नोटांचीही आरोपींनी विल्हेवाट लावली आहे. एक लाखांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात आरोपी पाच लाख बनावट नोटांची विक्री करत असल्याची बाब चौकशीमध्ये निष्पन्न झाली आहे.

एटीएस, आयबीकडूनही चौकशी

आरोपींकडून गुन्हे शाखेने लाखोंच्या बनावट नोटा जप्त केल्या असल्या तरी या प्रकरणाची दहशतवाद विरोधी पथक, आयबी, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून चौकशी करण्यात आली आहे. संबंधित तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती देखील घेतली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here