मुंबईः कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावरील ‘ ३’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत राज्य सरकारला बुधवारी मोठा धक्का बसला. कोर्टानं पुढील आदेशापर्यंत कांजूरमार्गच्या जमिनीवर मेट्रो कारशेडचे कोणतेही काम करण्यासही मनाई केली आहे. कोर्टाच्या या आदेशानंतर राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यासंदर्भात आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने या ‘मेट्रो’ प्रकल्पाचे कारशेड गोरेगावमधील आरे कॉलनीतून कांजूरमार्गमधील १०२ एकर जमिनीवर हलवून त्याचे कामही सुरू केलेले असताना या जमीन हस्तांतराचा मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा एक ऑक्टोबरचा आदेशच मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगित केला. त्यामुळं मुंबईकरांचा मेट्रो प्रकल्प पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री हेदेखील उपस्थित राहणार आहे.

अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकरी आंदोलन व मेट्रो प्रकल्पाबाबत चर्चा केली असतानाच ही माहिती दिली आहे. ‘कोर्टाच्या आदेशानंतर काल संध्याकाळपर्यंत मंत्रालयात अधिकाऱ्यांसोबत मिटिंग सुरु होती. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा झाली. यासंदर्भात आज पाच वाजता MMRDA ची बैठक आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. त्यावेळी याबाबत चर्चा होईल,’ असं अजित पवार म्हणाले आहेत.

कोर्टाचा निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ही राज्य सरकारला उल्लेख अहंकारी असा केला होता. फडणवीस यांच्या आरोपांवरही अजित पवारांनी भाष्य केलं आहे. कोर्टाचा निकाल लागल्यानंतर कोणी काय प्रतिक्रिया व्यक्त करायची हा ज्याचा त्याचा निर्णय आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज कृषी कायद्यांबाबत राज्य सरकारची महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीबाबतही अजितदादांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या देशातील शेतकरी आंदोलन करत आहेत. सुप्रीम कोर्टानंही केंद्राला चर्चा करण्यास सांगितलं आहे. महाविकास आघाडी सरकारने या विधेयकांविरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आज प्राथमिक चर्चा होणार आहे, असं ते म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here