म.टा. प्रतिनिधी, नगरः ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून राष्ट्रवादीच्या आमदाराने जाहीर केलेल्या योजनेवर विधान परिषदेतील विरोधपक्ष नेते यांनी टीका केली आहे. लोकांना असे प्रलोभन दाखविणे योग्य नसल्याचे दरेकर यांनी म्हटलं आहे.

पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी त्यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एक बक्षीस योजना जाहीर केली आहे. ज्या गावातील निवडणूक बिनविरोध होईल, त्या गावाला आमदार निधीतून २५ लाख रुपयांचा निधी विकास कामांसाठी दिला जाईल, अशी घोषणा लंके यांनी केली आहे. मतदारसंघात या योजनेचे स्वागत होत आहे. काही जिल्हा परिषद सदस्यांनीही अशा गावांसाठी जादा निधी देण्याची घोषणा केली आहे. लंके यांच्या या घोषणेची चर्चा सुरू असतानाच भाजप नेते दरेकर यांनी मात्र यावर टीका केली आहे.

दरेकर यांनी म्हटले आहे की, ‘राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची योजना वरकरणी चांगली वाटत असली तरी, गावांना २५ लाख रुपयांच्या बक्षीसाचं प्रलोभन देणं योग्य नाही. अशा प्रलोभनात्मक योजना सांगण्यापेक्षा त्यांनी मतदारसंघातील विकासात्मक कामांवर खर्च करावा,’ असा टोलाही दरेकर यांनी लगावला आहे.

लंके यांच्या घोषणेच्या व्यवहार्यतेवरही आता चर्चा सुरू झाली आहे. संपूर्ण मतदारसंघाच्या विकासासाठी आमदाराला २ ते अडीच कोटींचा स्थानिक विकास निधी मिळतो. हा निधी कोठे व कशासाठी खर्च केला जावा, याचेही नियम असतात. मतदारसंघात दोनशे ते अडीचशे गावे असतात. त्या सर्वांसाठी मिळून हा निधी असतो. बिनविरोध निवडणुका होऊन एकोपा टिकून राहण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी अशी योजना योग्य वाटत असली तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीत सरकारी यंत्रणेच्या अडचणी येऊ शकतात, अशीही चर्चा सुरू आहे. त्यातच आता दरेकर यांनी थेट टीका केली आहे.

फुटीचा फायदा भाजपला : दरेकर

ग्रामपंचायत निवडणुकांबद्दल दरेकर यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये भाजपची रणनिती काय असेल ते उघड होत आहे. दरेकर यांनी म्हटलं आहे की, महाविकास आघाडी एकत्रित लढताना काँगेस व शिवसेनेच्या ग्रामपंचायत हद्दीतील कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे जो परिणाम होणार आहे, स्वाभाविकपणे भाजपला त्याचा फायदाच होईल. आज सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा प्रभाव आहे.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here