पागनीस यापूर्वी मुंबई आणि रेल्वे या दोन्ही संघांकडून खेळला आहे. अमितच्या नावावर ९५ प्रथम श्रेणी सामने असून यामध्ये १० शतकांसह त्याने ५८५१ धावा केल्या आहेत. १० जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पागनीस यांची ही मुंबईचा प्रशिक्षक म्हणून पहिली स्पर्धा असेल. त्यानंतर ३१ मार्चपर्यंतचा कालावधी त्याच्यासाठी असेल.
पागनीस यांनी मुंबईच्या प्रशिक्षपदी निवड झाल्यानंतर सांगितले की, ” माझ्यावर सोपवण्यात आलेली ही सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि या पदाला न्याय देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. मुंबईच्या संघात बरेच नामांकित खेळाडू आहेत ज्यांनी आयपीएलही खेळले आहे. मी यापूर्वी मुंबईच्या काही ज्युनिअर संघांबरोबर प्रशिक्षकांचे काम केले आहे. या गोष्टीचा नक्कीच मला यावेळी फायदा होईल.”
भारताचा माजी वेगवान गोलंदाज सलिल अंकोलाची मुंबईच्या निवड समिती अध्यक्षपदी काल निवड करण्यात आली होती. अंकोला मुंबईकडून ५४ सामने खेळला आहे, या ५४ सामन्यांमध्ये १८१ विकेट्स अंकोलाच्या नावावर आहेत. त्याचबरोबर ४७ धावांमध्ये ६ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. अंकोला भारताकडून २० एकदिवसीय सामने खेळला होता. या २० सामन्यांमध्ये अंकोलाच्या नावावर १३ बळी होते.
अंकोलाच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमध्ये संजय पाटील, रवींद्र ठाकेर, जुल्फीकार पारकर आणि रवी कुलकर्णी यांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिशनच्या क्रिकेट सुधार समितीमध्ये माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत, समीर दिघे आणि रवींद्र कुलकर्णी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये मुंबई संघाच्या प्रशिक्षकाचीही घोषणा करण्यात येणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times