‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या ‘एफडीए’च्या अंतर्गत येणाऱ्या लस व संबंधित जैविक उत्पादन सल्लागार समितीने बैठकीत २०-० अशा मताने लशीला मंजुरी दिली. वय १८ वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांना करोनापासून बचाव करण्यास ही लस सक्षम असल्याचे समितीने म्हटले. जवळपास एक आठवड्याआधीच या समितीने फायजर आणि बायोएनटेक या कंपनीने विकसित केलेल्या लशीला मंजुरी दिली होती. अमेरिकेत या लशीसह लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आता या समितीने मॉडर्नाच्या लशीची शिफारस केली आहे.
वाचा:
पुढील प्रक्रिया काय असणार?
अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) सल्लागार समितीने मॉडर्नाची लस आणीबाणीच्या स्थितीत वापरण्याची शिफारस केली आहे. आता अन्न आणि औषध प्रशासनाकडून समितीच्या शिफारसी स्वीकारल्या जातील. त्यानंतर लस वापरास सुरुवात होईल. ही लस आणीबाणीच्या परिस्थितीत वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. फायजरप्रमाणेच ही लस आरोग्य कर्मचारी व इतरांना देण्यात येईल.
वाचा:
किती प्रभावी आहे लस?
करोनाविरोधात लढण्यास लस सुरक्षित आणि सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. मॉडर्नाने जवळपास ३० हजार स्वयंसेवकांवर लस चाचणी केली होती. चाचणीत ९४.१ टक्के लस प्रभावी असल्याचे दिसून आले. लस दिल्यानंतर मात्र काहीजणांना त्रास झाल्याचे दिसून आले. यामध्ये सौम्य स्वरुपाचा ताप येणे, डोकेदुखी आणि थकवा जाणवणे आदी लक्षणे आढळून आली. या साइड इफेक्टमुळे चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले.
वाचा:
किंमत किती?
फायजरच्या लशीप्रमाणे मॉडर्नाच्या लशींनाही अतिशय कमी तापमानात ठेवावे लागते. मॉडर्नाच्या लशीची किंमत ही ३२ ते ३७ डॉलरच्या घरात असण्याची शक्यता आहे. लशींची मागणी वाढल्यास किंमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, तरीदेखील विकसनशील देशांना ही लस कितपत परवडेल अशीही शंका उपस्थित करण्यात आली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times