मुंबई: हिंदुत्वाचा धागा सोडला तर जगण्याचा उद्देशच संपतो. त्यामुळे मुख्यमंत्री होऊन तुम्हाला इतरांसारखे नुसते बंगल्यात राहायचे नाही तर हिंदुत्व पुढे न्यायचे आहे आणि तेच करता येत नसेल तर मुख्यमंत्री होऊन उपयोग काय?, असा सवाल करतानाच हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे हिंदुत्वाचे विचार मांडले त्या सगळ्याची आठवण शिवसेनेच्या आजच्या नेतृत्वाने ठेवावी, इतकाच माझा सल्ला असेल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्मृतीस्थळावर जाऊन चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेबांना वंदन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुरुवातीला शिवसेनेवर या स्थळावरून कोणतीही टीका करणार नाही, असे सांगणाऱ्या पाटील यांनी नंतर शिवसेनेला सणसणीत टोले लगावले.

राहुल गांधी हिंदुत्ववादी झाले तर…

महाराष्ट्रातील सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. ही बाब स्वागतार्ह असून संजय राऊत म्हणाल्याप्रमाणे उद्धव यांच्यासोबत राहुल गांधीही अयोध्येत गेले तर आम्हाला अधिक आनंद आहे, असे पाटील म्हणाले. अयोध्येसोबतच उद्धव ठाकरे व राऊतांनी राहुल गांधींना अंदमानातही न्यावे आणि सावरकरांनी काय यातना झेलल्या असतील याची जाणीव करून द्यावी. तिथल्या काळकोठडीत त्यांना डांबा, असे आम्ही म्हणत नाही. मात्र, निदान त्यांचा सावकरांबद्दलचा गैरसमज तरी त्याने दूर होईल, असे पाटील म्हणाले. राहुल यांना जर सावरकर मान्य असतील व अयोध्येत राम मंदिर व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना तसे समजावून सांगावे आणि त्याउपर शिवसेनेच्या प्रयत्नाने राहुल गांधी हिंदुत्ववादी होणार असतील तर आणखीच बेस्ट… त्याचे प्रचंड स्वागत, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

मनसेसोबत युती, पाटलांनी घातली अट!

मनसे हिंदुत्वाचा विचार करून पुढे जाणार असेल तर त्याचे स्वागत असल्याचे पाटील म्हणाले. हिंदुत्वाचा व्यापक विचार स्वीकारल्यानंतर परप्रांतातून येथे येणाऱ्यांचा द्वेष करणारी, त्यांना त्रास देणारी संघटना अशी जी प्रतिमा आहे ती मनसेला बदलावी लागेल, असे पाटील म्हणाले. महाराष्ट्रात भाजप मनसेला सोबत घेणार का, असे विचारले असता काळाच्या ओघात काय काय घडामोडी होतात ते पाहावे लागेल. सुरुवातीला परप्रांतियांबद्दलची राज ठाकरेंची जी भूमिका आहे ती त्यांना सोडावी लागेल. तिथून किमान भाजप-मनसे मैत्रीचा विचार सुरू होईल, असे पाटील म्हणाले. राम मंदिर, कलम ३७०, नागरिकत्व कायदा यावर मनसेची भूमिका काय आहे, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जर भूमिका आणि मते जुळली तर राज ठाकरेच कशाला अशा समविचारी कुणासोबतही आम्हाला काम करायला आवडेल, असे पाटील म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here