म. टा. प्रतिनिधी, नगर: पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायत हद्दीतमध्ये बोगस कागदपत्राच्या आधारे ९१ बांगलादेशी व परप्रांतीय नागरिकांची नावे सामाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. तसे निवेदनही मनसेने जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांना दिले. ही ९१ नावे वगळण्यात यावी, अन्यथा आपल्या दालनात मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिला आहे.

दरम्यान, मनसेच्या निवेदनामुळे मतदार यादीतील नावाबाबत शंका उपस्थित झाली आहे. मतदार यादीत असणारे संबंधित ९१ मतदार हे मोकळ्या जागेत झोपडपट्टी बांधुन राहात असून त्याचे दर सहा महिन्यांनी स्थलांतर होत असते. या सर्वांना राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे बोगस आधार कार्ड व रेशन कार्ड मिळालेले आहे. त्या आधारावर सुपा-वाळवणे रस्त्यालगत गट नंबर ४२ मध्ये हे सर्व कच्च्या स्वरूपाची पाल-तंबू असा निवारा करून राहत आहेत. याबाबत ग्रामविकास अधिकारी यांनी सुद्धा पहाणी करून अहवाल सादर केला आहे. मतदार यादीत ही नावे बोगस असल्याचे निष्पन्न झाले, असे अहवालात म्हटले होते. पंचायत समिती सभापती यांना हा अहवाल दिला होता. तरी सुद्धा ही नावे वगळण्यात आली नाहीत, असेही मनसेच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

नवीन मतदार नोंदणी करता १५ वर्ष रहिवासी पुरावा ग्राह्य धरला जातो. तसा पुरावा ही सदर नाव नोंदणीत नाही, हे माहिती अधिकारात सिध्द झाले. तरी कुठल्या आधारावर ही नावनोंदणी झाली? हा प्रश्न उपस्थित झाला असून याबाबत अनेक राजकीय, सामाजिक संघटना यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्यानंतर सुद्धा ही नावे मतदान यादीतून वगळले नाहीत.

पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायत हद्दीतील यादी भाग नंबर २६७ व २६८ मध्ये आलेली ९१ बोगस नावे रद्द करावी, या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये या बोगस नावे असणाऱ्या लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी मागणीही मनसेने जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी यांना केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आपल्या दालनात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, अविनाश पवार, नितीन म्हस्के , उपजिल्हाध्यक्ष मारुती रोहकले यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here