नवी दिल्ली: अॅटलस या प्रसिद्ध सायकल कंपनीच्या मालकिणीने आत्महत्येपूर्वी चार-पाच जणांना एसएमएस करून पैशाची मागणी केली होती, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मात्र तिने कुणाला एसएमएस केले होते, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.

अॅटलस कंपनीची मालकिण नताशा कपूर यांनी आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहिली होती. त्यात त्यांनी मी स्वत:च्या नजरेतून पडल्याचं म्हटलं होतं. माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नये. मला जे करायला नको होतं. ते मी केलं. त्यामुळेच मीच माझ्या नजरेतून पडले, असं नताशा यांनी सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे नताशा यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्या इतपत नेमकं कोणतं कृत्य केलं? याचं पोलिसांना कोडं पडलं आहे. नताशा यांनी या सुसाइड नोटमध्ये पती आणि कुटुंबावरचं प्रेमही व्यक्त केलं आहे. मी संजय कपूर, माझी मुलगी आणि मुलगा यांच्यावर मनसोक्त प्रेम करते, असं त्यांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी नताशा यांची सुसाइड नोट आणि त्यांचा फोन ताब्यात घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नताशा यांनी मृत्यूपूर्वी चार-पाच जणांना एसएमएस करून पैसे मागितले होते. नताशा यांनी पैसे उधार दिले होते का? किंवा त्यांना पैशाची गरज होती का? याबाबतही पोलिसांचा तपास सुरू आहे. शिवाय नताशा यांनी ज्या लोकांना एसएमएस केले होते, त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सींगितलं.

दरम्यान, काल नवी दिल्लीतील डॉ. एपीजे अब्दुल कलाम मार्गावरील त्यांच्या घरात नताशा यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. नताशा यांच्या मृतदेहावर दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here