म. टा. प्रतिनिधी, मुंबई

वातानुकूलित लोकलच्या पहिल्याच दिवशी अत्यंत कमी प्रतिसाद आल्याने प्रवासी वाढवण्यासाठी थेट जनसामान्यांपणे पोहचण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासनाने सुरू केल्या आहेत. एसी लोकलबाबत प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी प्रवासी सर्वेक्षण करण्याचा निर्णय ने घेतला आहे.

‘एसी लोकल ही रस्ते प्रवासापेक्षा अधिक स्वस्त आणि आरामदायी आहे. रस्तेमार्गे एकल प्रवासासाठी प्रवाशांना प्रतिकिमी चार रुपये खर्च येतो. एसी लोकलने मात्र ७० पैसे प्रतिकिमी एवढाच खर्च येतो. लोकलचा पास काढल्यास अमर्यादित प्रवासदेखील मिळतो, हे तुम्हांला माहिती आहे का?’ असा प्रश्न या सर्वेमध्ये आहे. या प्रश्नाबरोबर दराचा तक्ता जोडण्यात आला आहे.

प्रवाशांना या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये सकाळची सोयीची वेळ, संध्याकाळची सोयीची वेळ यांची माहिती भरता येईल. सीएसएमटी-कल्याणसह, हार्बर, गोरेगाव आणि अन्य अशा १० मार्गांचा तपशीलही देण्यात आला असून यापैकी सोईचा मार्ग निवडण्याची मुभा प्रवाशांना आहे. तसेच प्रवाशांचा व्यवसाय आणि वय हा तपशीलही या फॉर्ममध्ये भरावा लागेल.

आठ प्रश्नांचा समावेश असलेल्या या सर्वेमध्ये ‘होय’ किंवा ‘नाही’ अशा स्वरूपात माहिती प्रवाशांना भरायची आहे. या सर्वेक्षणातून काढलेल्या निष्कर्षाआधारे सर्वाधिक मते मिळालेल्या वेळेचा, मार्गाचा विचार सुधारित वेळापत्रकात करण्यात येईल. त्याचबरोबर कोणत्या व्यवसायातील प्रवाशांनी कोणत्या वेळेची मागणी केली, याबाबत आढावा घेऊन सामान्य लोकल फेऱ्या रद्द न करता चालवण्याचा प्रयत्न असणार आहे, असे मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रदूषणमुक्त आणि आरामदायी प्रवासासाठी वातानुकूलित लोकल मुंबईकरांसाठी आणण्यात आली. रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी याचा त्रास एसी लोकलमध्ये सहन करावा लागणार नाही. कल्याण ते सीएसएमटीचा रस्तेमार्गे आणि एसी लोकलमार्गे प्रवासखर्चाची तुलना केल्यास एसी लोकल अनेक पटींनी स्वस्त असल्याचे स्पष्ट होते. एसी लोकलचा पास काढल्यास आणखी फायदा मिळतो.

– शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे

कल्याण ते सीएसएमटी अंतर – सुमारे ५७ किलोमीटर

-रस्तेमार्गे प्रवास खर्च – सुमारे ७००-९०० (वातानुकूलित कार)

-एसी लोकल – सुमारे २१३५ मासिक पास

फॉर्म व्हायरल

प्रवाशांच्या अडचणी मांडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर प्रतिनिधींची नेमणूक केली आहे. एसी लोकलचा सर्वेक्षण फॉर्म प्रवासी संघटनांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here