वाचा:
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि आमदार निधीतून २५ लाख रुपये मिळवा, अशी योजना आमदार नीलेश लंके यांनी जाहीर केली आहे. त्यासाठी त्यांनी गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेण्यास सुरुवात केली आहे. लंके यांनी जाहीर केलेल्या या योजनेचे अण्णा हजारे आणि आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच यांनीही कौतुक केले आहे. असे असले तरी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मात्र हे एकप्रकारे प्रलोभन असल्याची टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर लंके यांच्या या योजनेला राळेगणसिद्धी गावातून पहिला प्रतिसाद मिळाला आहे.
वाचा:
सुपे येथे काही गावांच्या कार्यकर्त्यांची बैठक लंके यांनी बोलविली होती. त्यामध्ये राळेगणसिद्धीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता. या गावात औटी आणि मापारी असे दोन प्रमुख गट आहेत. या दोन्ही गटांचे नेते बैठकीला उपस्थित होते. माजी सरपंच जयसिंग मापारी, लाभेश औटी, सुरेश पठारे, दत्ता आवारी हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. समान जागा वाटप करून घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यावर दोन्ही गटांनी सहमती दर्शविली आहे. पारनेर तालुक्यात अशी सहमती करणारे आणि लंके यांच्या योजनेला प्रतिसाद देणारे राळेगणसिद्धी पहिलेच गाव ठरले आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत २३ ते ३० डिसेंबर आहे. त्यावेळीच खऱ्या अर्थाने ही सहमती टिकते की नाही, हे स्पष्ट होणार आहे.
वाचा:
अण्णा हजारे यांनी ग्रामविकासाचे काम आपल्या या गावापासून सुरू केले. गावात त्यांचा शब्द प्रमाण मानला जात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बहुतांश वेळा निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. गेल्यावर्षी मात्र निवडणूक घेण्याची वेळ आली होती. २०१६ मध्ये सेवा सोसायटीच्या निवडणुकांवरून हाणामारीही झाली होती. अलीकडेच हजारे यांनी आता आपण गावातील लक्ष कमी करणार असल्याचे बोलून दाखविले होते. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेली ही सहमती लक्षवेधक ठरत आहे. पक्ष-पार्ट्यांपासून दूर रहा, असे हजारे सांगत असतात. त्यामुळे गावातील निवडणुकीला शक्यतो पक्षीय स्वरूप येऊ दिले जात नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत हजारे यांचे ताणले गेलेले संबंध सर्वांनाच माहिती आहेत. त्यांनी परस्परांवर टीकाही केलेली आहे. अशाच एका घटनेत पूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रतिआंदोलन करण्यासाठी राळेगणसिद्धीत धाव घेतली होती. त्यावेळी राळेगणसिद्धी ग्रामस्थ विरूद्ध राष्ट्रवादी असे स्वरूप त्या वादाला आले होते.
आता शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले लंके पारनेरचे आमदार आहेत. नीलेश लंके यांचे या गावाशी आणि स्वत: अण्णा हजारे यांच्याशीही चांगले संबंध आहेत. नीलेश लंके यांनी जाहीर केलेल्या योजनेला भाजपकडून विरोध झाल्याने लंके यांच्यासाठी ही योजना प्रतिष्ठेची बनली आहे. अशा परिस्थितीत राळेगणसिद्धीकरांनी आणि हजारे यांनीही त्यांना साथ दिल्याचे पहायला मिळत आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times