‘एबीसीडी’ सिनेमालिकेतीलच ‘स्ट्रीट डान्सर’ हा सिनेमा आहे. आता सिनेमाचे नाव तांत्रिक कारणास्तव वेगळे असले तरी सिनेमाचा मूळ गाभा हा जुनाच आहे. गल्ली-बोळात संघर्ष करणारी तरुण पिढी आणि त्यांच्या अंगी असलेले नृत्याचे कौशल्य त्यांना इतरांपासून वेगळे ठरवते. डान्स आणि त्याच्याभोवती फिरणारे कथानक; हीच सर्वसाधारण गोष्ट इथेही आहे; परंतु ही गोष्ट मांडताना पटकथेच्या कथानकाला मिळालेल्या आधारामुळे सिनेमा उंचावतो. अगोदरच्या दोन सिनेमांच्या तुलनेत फरक इतकाच आहे की, आता तिसऱ्या पर्वात सिनेमाची पात्रे सातासमुद्रापार लंडनमध्ये गेली आहेत. सहेज (वरुण धवन), कथेचा नायक त्याच्या कुटुंबासमवेत लंडनमध्ये राहतो. तो मूळचा भारतीय आहे. सहेजला आपल्या डान्सर भावाचे एक स्वप्न पूर्ण करायचे आहे. सहेजचा भाऊ दुखापतीमुळे डान्स करण्यास असमर्थ आहे. मात्र, ‘स्ट्रीट डान्सर’ या त्यांच्या ग्रुपला जगविख्यात अंडरग्राउंड डान्स स्पर्धा जिंकवून द्यायची आहे. सोबतच लंडनमध्ये स्ट्रीट डान्सरच्या बरोबरीने आणखी एक ‘रुल ब्रेकर्स’ म्हणून डान्स टीम आहे. या टीमची प्रमुख आहे इनायत (श्रद्धा कपूर). इनायतदेखील लंडनची रहिवाशी असली,तरी ती मूळची पाकिस्तानी आहे. आता भारत-पाकिस्तान म्हटल्यावर टशन तर होणारच, हीच टशन आपल्याला सिनेमाच्या पूर्वार्धात दिसते.
सिनेमाच्या या डान्स ड्रामासोबतच राम प्रसादच्या (प्रभुदेवा) एन्ट्रीने एक इमोशनल ट्रॅक सिनेमाच्या कथानकाशी जोडला जातो. आता हा भावनिक ट्रॅक काय आहे? सिनेमाचे कथानक कुठे वळण घेते यासाठी सिनेमा पाहायला हवा. कारण, भारतीय आणि पाकिस्तानी एकत्र येऊन एका सत्कर्म ध्येयासाठी काय काय आणि कसे करतात हा सिनेमाचा उत्तरार्थ बघण्याजोगा आहे. सहेज आणि इनायत जे एकमेकांच्या विरुद्ध डान्स करत होते ते एकत्र एका संघात डान्स का करतात? त्यामागचे नेमके असे कोणते ‘कारण’ आहे? हे ‘कारण’ म्हणजेच हा ‘स्ट्रीट डान्सर’ सिनेमा आहे. सिनेमाचे कथानक जरी सिनेमॅटीक लिबर्टी घेऊन पडद्यावर मांडण्यात आले असले तरी सिनेमाची मूळ गोष्ट ज्या सत्यघटनेच्या प्रेरणेतून घेण्यात आली आहे, त्या घटनेच्या निवडीसाठी दिग्दर्शक रेमो डिसूजाचे कौतुक करायला हवे. दिग्दर्शकीय आणि नृत्य दिग्दर्शनाच्या पातळीवर रेमोचे उत्कृष्ट काम झाले आहेत.
वरुण धवन याने काही दृश्यांमध्ये केलेला अभिनय रेखीव आहे. त्याचे डोळे काही प्रसंगी अधिक बोलून जातात. सोबतच स्क्रीनवर सहज वावरणाऱ्या श्रद्धा कपूरने देखील आपली भूमिका उत्तम साकारली आहे. तिचा डान्सही सरस झाला आहे. पुनित पाठक, धर्मेश, सलमान युसुफ खान, राघव या सर्व डान्सर्सनी त्याचा डान्स तर उत्तम केलाच आहे; पण सोबतच अभिनयातही बाजी मारली आहे. त्याचप्रमाणे साथीला प्रभू देवा आपल्या एंट्रीला टाळ्या-शिट्या कमावतातच. परंतु, या सगळ्यात नोरा फतेहीचे विशेष कौतुक करायला हवे. तिने ‘हाय गर्मी’ या गाण्यावर केलेले नृत्य लाजबाब आहे. याच गाण्यासाठी झालेले छायांकन देखील आपल्या नजरेत भरते. संपूर्ण सिनेमा नीटनेटका झाला असला तरी तो काही ठिकाणी प्रेडिक्टेबल झाला आहे. सिनेमाचे काही संवाद देखील गुळगुळीत आहेत. संगीताच्या आणि सिनेमातील व्हिज्युअल इफेक्टच्या बाबतीत तो उजवा ठरतो आणि आपल्या मनात भरतो.
निर्माता : भूषण कुमार
दिग्दर्शक : रेमो डिसूजा
लेखन : रेमो डिसूजा, फरहाद समजी
पटकथा : तुषार हिरानंदानी, जगदीप सिद्धू
कलाकार : श्रद्धा कपूर, वरुण धवन, नोरा फतेही, प्रभूदेवा
छायांकन : विजय कुमार अरोरा
संकलन : मनन अजय सागर
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times