म. टा. प्रतिनिधी, मुंबई

देशात विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत असताना, समाजात फूट पाडण्याचा उद्योग केंद्रातील भाजप सरकार करीत आहे, असा आरोप करून अशा मंडळीच्या हातात पुन्हा सत्ता देणे चुकीचे आहे. आपल्याला याचा विचार करावा लागणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी गुरुवारी मुंबईत केले. विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी भाजपच्या विरोधात मतदान केल्यामुळेच तीन पक्षांचे सरकार सत्तेत आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. अल्पसंख्याक समाजाच्या अनेक समस्या असून, त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या देशात भाजपची सत्ता आहे. राज्यकर्त्यांनी समाजातील सर्व वर्गांना सोबत घेऊन जायचे असते, ही नेतृत्वाची जबाबदारी असते. देशातील सर्व लोकांना घटनेने समान अधिकार दिले असले, तरी त्यांच्या मनात शंका निर्माण केली जात आहे, असा आरोपही पवार यांनी केला.

पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेच्या काही भागांत काही भारतीय राहत आहेत. त्यांना आपल्या देशात परत यावेसे वाटते. त्यांचा तो अधिकार आहे. परंतु, ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांना ते मान्य नसल्याचा आरोप पवार यांनी केला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या माध्यमातून मुस्लिमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भटक्या विमुक्त जाती जमातीचे लोक कामानिमित्त सतत स्थलांतरित होत असतात. अशा लोकांच्या नोंदी मिळत नाहीत. अशा लोकांवरही पुरावे देण्याची वेळ भाजपने आणली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

अल्पसंख्याक विभाग मला द्यावा, अशी इच्छा प्रदर्शित करणारे नवाब मलिक यांच्याकडे त्या खात्याची जबाबदारी देण्यात आली असून, ते अल्पसंख्याक समाजासाठी चांगले काम करतील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. सरकार चालवताना अनेक अडीअडचणी असल्या, तरी अल्पसंख्याक विभागाला कोणतीही अडचण येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

‘नाही रे’ वर्गाला न्याय देणार

‘नाही रे’ वर्गाला न्याय देण्यासाठी पक्षाचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीकडे सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याक ही खाती आपल्या पक्षाकडे घेतली, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. राज्यातील मुस्लिम विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क सवलत देण्याची जबाबदारी नवाब मलिक यांनी आपल्या विभागातून पार पाडावी, अशी अपेक्षा पाटील यांनी बोलून दाखविली. या बैठकीत अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक, शब्बीर विद्रोही, माजिद मेमन, गफार मलिक यांनी विचार मांडले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here