नवी दिल्लीः जम्मू-काश्मीर क्रिकेट घोटाळ्याप्रकरणी ( ) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी मुख्यमंत्री ( ) यांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने जेके क्रिकेट असोसिएशनच्या फंड घोटाळ्याप्रकरणी फारूक अब्दुल्लांशी संबंधित ३ घरे, २ प्लॉट आणि १ व्यावसायिक मालमत्ता जप्त केली आहे. याची किंमत बाजारात सुमारे १२ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतंय.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांच्या जेके क्रिकेट असोसिएशनच्या ( ( jammu and kashmir cricket association ) ) फंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांपैकी एक श्रीनगरमधील गुपकार रोडवर आहे. जम्मूमधील तनमर्ग आणि भटिंडी तहसीलमधील कटीपोरा तहसीलमध्ये प्रत्येकी एक मालमत्ता आहे. याशिवाय श्रीनगरमधील रेसिडेन्सी रोड भागात देखील एक व्यावसायिक मालमत्ता आहे. या सर्वांची बाजारभावाने एकूण किंमत ११.८६ कोटी रुपये असल्याचे सांगितलं जातं.

फारूक अब्दुल्ला यांच्या एकूण सहा मालमत्ता जप्त करण्यात आल्या त्यात ३ निवासी घरे, एक व्यावसायिक मालमत्ता आणि दोन भूखंडांचा समावेश आहे. जेके क्रिकेट घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे, असं ईडीने म्हटले आहे.

उमर अब्दुल्लांनी साधला निशाणा

फारुख अब्दुल्ला यांची मालमत्ता केल्याने त्यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ईडीने मालमत्ता जप्तीची जी कारवाई केली आहे त्यातील बहुतेक मालमत्ता या १९७० च्या दशकातील वडिलोपार्जित संपत्ती आहे आणि त्यापैकी सर्वात नवीन २००३ मध्ये बांधली गेली होती. यामुळे मालमत्ता जप्तीचं औचित्यच उरलेलं नाही. कारण तपासादरम्यान “गुन्हा” सिद्ध करण्यात ईडी अपयशी ठरली आहे, असं उमर अब्दुल्ला म्हणाले.

२००५- ०६ ते डिसेंबर २०११ या कालावधीत JKCA ला बीसीसीआयकडून १०९. ७८ कोटी रुपये मिळाले होते, असे तपासात उघड झाले आहे. २००६ ते जानेवारी २०१२ दरम्यान, डॉ. फारूक अब्दुल्ला जेकेसीएचे अध्यक्ष असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आणि जेकेसीएमध्ये पदाधिकाऱ्यांची अवैध नियुक्ती केली. यामुळे त्यांना जेकेसीए निधीच्या लॉन्ड्रिंगच्या उद्देशाने आर्थिक अधिकार मिळाले होते. फारुख अब्दुल्ला देखील जेकेसीए फंडाचे लाभार्थी असल्याचं तपासात समोर आलं आहे, असा दावा ईडीने केला आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांची जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील निधीच्या गैरव्यवहार प्रकरणी ऑक्टोबरच्या सुरुवातीला अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केली होती. ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावल्यानंतर फारूक कार्यालयात गेले होते. पण फारूख अब्दुल्ला यांनी ईडीच्या नोटिसावर नाराजी व्यक्त केली आणि हा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता.

११३ कोटींचा गैरव्यवहार

गैरव्यवहार प्रकरणात ईडीने यापूर्वी अब्दुल्ला यांची ६ तास चौकशी केली होती. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये ११३ कोटींचे कथित गैरव्यवहार प्रकरण खूप जुने आहे. यापैकी सुमारे ४३.६९ कोटी रुपयांचा अपहार केला गेला आणि हे पैसे खेळाडूंवरही खर्च केले गेले नाहीत, असा आरोप आहे.

पूर्वी या प्रकरणाचा तपास जम्मू-काश्मीर पोलिस करत होते. पण नंतर कोर्टाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं. मात्र, या संपूर्ण प्रकरणात नंतर ईडीची एन्ट्री झाली. कारण हे प्रकरण मनी लाँड्रींगशी संबंधित असल्याचं सांगण्यात आलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here