दौंडजवळील लिंगाळी गावच्या हद्दीत खडकवासला उपफाटा बंद कॅनलवर केदार उर्फ पिंटू श्रीपाद भागवत (वय ४५, रा. शालीमार चौक, दौंड) याचा डोक्यात दारूची बाटली आणि दगड मारून खून करण्यात आला होता. १३ नोव्हेंबरच्या रात्री ही घटना घडली. पोलिसांना १४ नोव्हेंबरला याबाबत मिळाली होती. केदार भागवत हा दौंडमधील प्रसिद्ध फोटोग्राफर होता. दौंड पोलिस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करीत होते.
जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी ओंकार उर्फ काका गावडे (२१, रा. बेटवाडी, ता. दौंड), राजेश बिबे (१९, रा. गिरीम, ता. दौंड, मूळ. रा. माळेवाडी, जि. बीड), अजय पवार (१९, रा. लोणीकाळभोर, ता. हवेली), विशाल आटोळे (२४, रा. गोपाळवाडी, ता. दौंड) यांनी दौंड पोलिस स्टेशनच्या हद्दीत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार केल्याचे कबूल केले. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, नारायण पवार, पृथ्वीराज ताटे आदींनी ही कारवाई केली.
असा लागला छडा…
चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी करताना भागवत खून प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती आले. बिबे आणि पवार या दोघांनी मिळून दौंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीस चोरीच्या उद्देशाने मारल्याचे सांगितले. यातून पुणे ग्रामीणच्या गुन्हे शोधपथकाने भागवत खूनप्रकरणाचा छडा लावला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times