मुंबईः कांजूरमार्ग मेट्रो कारशेडसाठी विरोधकांनी चर्चेदरम्यान कांजूर मार्गचा प्रश्न सोडवावा, आम्ही श्रेय द्यायला तयार आहोत, असं आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्ष नेते यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हा प्रश्न श्रेय देण्याचा नाही तर, मुंबईकरांच्या सोयी सुविधेचा आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी वादावरही भूमिका स्पष्ट केली तसंच, कारशेडचा वाद सोडवण्यासाठी विरोधकांनीही पुढं यावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

‘मेट्रो कारशेडचा प्रश्न श्रेयवादाचा नाही तर, मुंबईकरांच्या सोयी- सुविधेचा आहे. श्रेयासाठी काम करणे हा भाजपचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरुर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला?,’ असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

‘महाविकास आघाडी सरकारच्या समितीनेच सांगितलं की कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय ४ वर्षांचा विलंब वेगळा. कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता?,’ असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते काम जवळपास ८० टक्के पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा व वेळ दोन्ही वाया जाणार, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवाय, मुंबईकरांनी आधीच खूप भोगलं आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करु नका, ही हात जोडून विनंती आहे,’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here