दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ रविवारी राळेगणसिद्धीला आले होते. त्यांनी हजारे यांना दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. मात्र, हजारे स्वतंत्रपणे आंदोलन करणार आहेत. दिल्लीत आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. जंतर-मंतर किंवा रामलीला मैदानाचे पर्याय त्यांनी सूचविले आहेत. नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील ११ जणांचे एक शिष्टमंडळ राळेगणसिद्धी येथे आले होते. या आंदोलनात हजारे यांनी सहभागी व्हावे, अशी विनंती त्यांनी केली. हजारे यांनी ऐकले नाही तर राळेगणसिद्धीमध्येच थाळीनाद आंदोलन करण्याचाइशाराही त्यांनी दिला होता. सुरवातीला त्यांना भेट नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
त्यांनी सांगितले की, दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना हजारे तिकडे आले नाहीत. त्यांनी केवळ शेतकऱ्यांसोबत दोन पावले चालले तरी शेतकऱ्यांना लढण्यासाठी बळ येईल. मात्र, हजारे यांना सत्ताधाऱ्यांची भीती वाटत असावी, असा आम्हाला संशय आहे. तेच विचारण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. त्यांनी कुंभकर्णी झोप सोडून आमच्यासोबत मोकळपणाने यावे, असेही या प्रतिनिधींनी सांगितले.
हे शिष्टमंडळ राळेगणसिद्धीत गेले तेव्हा हजारे यांनी खोलीतून बाहेर येऊन त्यांची भेट घेतली. त्यांचे म्हणने ऐकून घेतले. आपण खूप पूर्वीपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करीत असल्याचे हजारे यांनी त्यांना सांगितले. मात्र, दिल्लीतील थंडी, करोना आणि सुरक्षेच्या कारणास्तव सध्या सुरू असलेल्या दिल्लीतील आंदोलनात सहभागी होऊ शकत नाही, असेही हजारे यांनी त्यांना सांगितले. दिल्लीहून आलेल्या शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ या चर्चेनंतर परत गेले आहे.
दरम्यान, या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी पूर्वीच दिला आहे. त्यानुसार त्यांनी दिल्लीची निवड केली आहे. दिल्लीत रामलीला मैदान किंवा जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याची परवानगी मिळावी, असे पत्र त्यांनी सरकारला पाठविले आहे.
हजारे यांची आंदोलन करण्याची तयारी सुरू असली तरी त्यांचे हे आंदोलन त्यांच्या कृषिमूल्य आयोगाला संवैधानिक दर्जा आणि स्वायतत्ता देणे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे, शेतकऱ्यांना आवश्यक असलेली कृषी अवजारे सवलतीत उपलब्ध करून देणे वगैरे मागण्यांसाठी आहे. सध्या दिल्लीत सुरू असलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाचा हजारे यांच्या आंदोलनाता थेट संबंध नाही. त्या आंदोलनाला हजारे यांनी पाठिंबा दर्शविला असला तरी त्याच सहभागी होण्यापेक्षा आपले स्वतंत्र, समांतर आंदोलन करण्याचा निर्णय हजारे यांनी घेतला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times