नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात अजूनही शेतकर्‍यांचे आंदोलन ( ) सुरू आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी तळ ठोकून आहेत. कृषी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असं शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, उद्या सोमवारी २४ तासांचं उपोषण करणार ( hunger strike ) असल्याचा शेतकऱ्यांनी जाहीर केलं आहे. यासह २५ ते २७ डिसेंबरदरम्यान हरयाणातील महामार्गांवरील टोलवसुली करू देणार नाही. तसंच २३ डिसेंबरला म्हणजे येत्या बुधवारी शेतकरी दिवस आहे. या दिवशी देशातील जनतेने एक दिवसाचं उपोषण करावं, असं आवाहन शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी केलं आहे.

आंदोलनाच्या ठिकाणांवर शेतकरी सोमवारी एक दिवसाचे उपोषण करतील. २५ ते २७ डिसेंबर दरम्यान हरयाणामधील सर्व महामार्गांवर टोलवसुली करू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. गेल्या चार आठवड्यांपासून हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत आणि नवीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत.

“सोमवारी आंदोलनांच्या सर्व ठिकाणी शेतकरी एक दिवसाचं उपोषण करतील. सिंघू सीमेवर आंदोलनाला करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ११ सदस्यांची एक टीम या उपोषणाला सुरवात करेल. तसंच कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या देशाभरातील आंदोलकांनीही एक दिवसाचं उपोषण करावं, असं आवाहन उपोषणाची घोषणा करणारे स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी केलं आहे.

PM मोदींच्या ‘मन की बात’च्या वेळी थाळीनाद

येत्या २७ तारखेला पंतप्रधान मोदी ‘मन की बात’मधून संवाद साधणार आहेत. यावेळी सर्व शेतकरी थाळीनाद करून आपला निषेध नोंदवतील, असं आवाहन जगजितसिंग ढल्लेवाला यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींचे संबोधन संपेपर्यंत थाळीनाद सुरू ठेवावा, असं ते म्हणाले.

शेतकरी नेते कृषीमंत्र्यांना भेटले

एकीकडे ऐन थंडीत शेतकऱ्यांचे नवीन कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर आंदोलन सुरू आहे. तर, दुसरीकडे काही शेतकरी या कायद्यांना पाठिंबा देत आहेत. रविवार पश्चिम यूपीतील शेतकऱ्यांनी कृषी भवन येथे कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली. आणि नवीन कायद्यांना समर्थन देणारे निवेदन सादर केले.

शेतकरी आंदोलनादरम्यान आतापर्यंत ३३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तरीही पंतप्रधान यावर एक शब्दही बोलायला तयार नाही, असं म्हणत कॉंग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here