मुंबईः ‘चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबवणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आडून २०२४च्या निवडणुकीचा प्रचार आहे,’ असा आरोप शिवसेनेनं भाजपवर केला आहे.

अयोध्येतील राममंदिरासाठी संक्रातीपासून वर्गणीचे काम सुरु होणार आहे. चार लाखांहून अधिक स्वयंसेवक १२ कोटी कुटुंबांसोबत संपर्क साधणार आहेत. हे स्वयंसेवक गावागावांत जातील, असं विश्व हिंदू परिषदेचे चंपतराय यांनी सांगितलं आहे. शिवसेनेनं या उपक्रमावर सडकून टीका केली असून भाजपवरही निशाणा साधला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून शिवसेनेनं राम मंदिराच्या वर्गणीसाठी सुरू करण्यात येणाऱ्या संपर्क अभियानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

‘रंजन गोगोई यांनी त्यांच्या अखेरच्या काळात वेगवान पद्धतीने या प्रकरणाची सुनावणी घेतली व राममंदिराबाबत सकारात्मक निर्णय घेतला. न्यायालयाचा निर्णय होताच पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मंदिराचे भूमिपूजनही झाले. मंदिराचे काम वेगाने सुरू झाले आहे. म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तंबूत विराजमान झालेले रामलल्ला मंदिरात विराजमान होतील,’ असं शिवसेनेनं या अग्रलेखात म्हटलं आहे.

‘मर्यादा पुरुषोत्तम रामाचे मंदिर हे देशाच्या अस्मितेचे मंदिर आहे व त्यासाठी जगभरातील हिंदुत्ववाद्यांनी आधीच खजिना रिकामा केला आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करून काय साध्य करणार? चार लाख स्वयंसेवकांची नेमणूक त्याकामी झाली असेल तर त्या स्वयंसेवकांची पालक संघटना कोणती, हे स्पष्ट झाले तर बरे होईल. वर्गणीच्या नावाखाली हे चार लाख स्वयंसेवक एखाद्या पक्षाचे राजकीय प्रचारक म्हणून घरोघर जाणार असतील तर मंदिरासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक आत्म्याचा तो अवमान ठरेल,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘मंदिराचा लढा हा राजकीय नव्हता. तो समस्त हिंदू भावनांचा उद्रेक होता. त्याच उद्रेकातून पुढे हिंदुत्वाचा वणवा पेटला व आजचा त्याच वणव्यावर भाजलेल्या पोळ्या खात आहे. अर्थात आम्हाला त्याचे दुःख नाही. शिवसेनेने मंदिरनिर्माणासाठी एक कोटीचा निधी सगळय़ात आधी रामलल्लाच्या बँक खात्यात जमा केला. याकामी अयोध्येत रामलल्लाच्या नावे बँक खाते उघडले असून त्यात जगभरातील रामभक्त सढळ हस्ते मदत करीत आहेत. एव्हाना मंदिरासाठी लागणारा ३०० कोटींचा निधी प्रभू श्रीरामांच्या नावे असलेल्या बँक खात्यात जमाही झाला असेल,’ असंही यात नमूद केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here