पवार यांच्या वाढदिवसापासून रोहित यांनी त्यांच्या ८० निर्णयांची आणि कामांची माहिती नव्या पिढीला करून देण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये ही एक कामगिरी त्यांनी सांगितली आहे. दिल्लीच्या सीमेवर सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे पंजाबसह शेजारील राज्यांत सध्या सरकारविरोधी वातावरण धुमस्ते आहे. अशातच आंदोलकांवर विविध लेबले लावून टीकाही झाली आहे. अशा परिस्थितीत पंजाबमध्ये त्या काळात पवार यांनी कशी शांतता प्रस्थापित केली होती, याबद्दल रोहित यांनी केलेली पोस्ट लक्षवेधक ठरत आहे.
रोहित पवार यांनी म्हटले आहे, ‘खलिस्तानचे पुरस्कर्ते भिंद्रनवाले यांच्या सशस्त्र समर्थकांनी अमृतसरमध्ये पवित्र सुवर्ण मंदिराचा ताबा घेतला होता. त्यांना हुसकावण्यासाठी केलेली ‘ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई, नंतर १९८४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची झालेली हत्या आणि त्यानंतर शिखांचं झालेलं शिरकाण या लागोपाठच्या घटनांमुळं पंजाबमध्ये अशांतता निर्माण झाली होती. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधानपदी आलेल्या राजीव गांधी यांच्यापुढं हे एक मोठं आव्हान होतं. त्यावेळी केंद्रीय गृहसचिव असलेले राम प्रधान यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार यांची मदत घेण्यास राजीव गांधी यांना सुचवलं. फाळणीसारख्या मानसिकतेची बीजं देशात पुन्हा रोवली जाऊ नयेत आणि देशाला ते परवडणार नाही म्हणून पंतप्रधान गांधी यांच्या सांगण्यावरुन शरद पवार यांनी ही जबाबदारी स्वीकारली.
तेव्हा चर्चेसाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी पंजाबपासून दूर मध्य प्रदेशात पंचमढी इथं तुरुंगात ठेवलेले पंजाबमधील अकाली दलाचे प्रमुख नेते प्रकाशसिंग बादल, हरचरणजितसिंग लोंगोवाल, सुरजितसिंग बर्नाला यांना पवार यांनी आधी दिल्लीतील तिहार जेलमध्ये हलवण्यास सांगितलं. दिल्लीत पवारांनी त्यांच्याशी अनेकदा संवाद साधला. चर्चेसाठी पूरक वातावरण निर्माण केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान गांधी यांच्याशीही त्यांची चर्चा घडवून आणली. पुढं मार्च १९८५ मध्ये या नेत्यांची सुटका झाली आणि २४ जुलै १९८५ मध्ये राजीव गांधी आणि लोंगोवाल यांच्यात अकरा कलमी ‘राजीव-लोंगोवाल करार’ झाला. या कराराची संमिश्र प्रतिक्रिया उमटली, पण हा करार म्हणजे पंजाब आणि देशासाठी महत्वाचं पाऊल होतं आणि त्यासाठी पवार यांनी केलेलं केलेले प्रयत्नही तेवढेच महत्त्वाचे होते,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times