म. टा. प्रतिनिधी, जळगाव: धरणगाव विधानसभेतून राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री निवडून आले आहेत. त्यांच्यात या धरणगाव तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. धरणगाव शहरात हिवाळ्यात आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचा गळा सुकायला लागला आहे. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी आज दुपारी धरणगाव नगरपालिकेवर ‘जनआक्रोश हंडा मोर्चा’ काढत नगरपालिका प्रशासन तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बद्दल रोष व्यक्त केला. विशेष म्हणजे धरणगाव नगरपरिषदेवर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची सत्ता आहे.

मागील दोन वर्षात जळगाव जिल्ह्यात समाधानकार पाऊस झाला असतांना देखील धरणगाव शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. मुबलक पाणी उपलब्ध असताना देखील पाणीपुरवठ्याच्या योग्य नियोजनाअभावी नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होऊ शकत नाही. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा प्रश्न तडीस जात नसल्याने आज सोमवारी संतप्त नागरिकांनी धरणगाव नगरपरिषदेवर धडक दिली. महिला तसेच आबालवृद्ध डोक्यावर पाण्याचे खाली हंडे घेऊन नगरपालिकेवर धडकले. मोर्चा नगरपालिकेवर धडकल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहराला सुरळीत पाणीपुरवठा केला पाहिजे, अशी एकमुखी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

सत्ताधाऱ्यांनी खूर्च्या सोडा; महिलांचा संताप

मोर्चेकऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. दैनंदिन कामात महिलांना पाणीटंचाईमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे आहे. दररोज दिवस उगवल्यानंतर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. नगरपालिका नागरिकांना मूलभूत सुविधा देखील पुरवू शकत नसेल तर काय उपयोग? सत्ताधाऱ्यांनी खुर्च्या सोडाव्यात, असा संतप्त प्रतिक्रिया महिलांनी यावेळी व्यक्त केल्या.

महिलांनी फोडले माठ

धरणगाव नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. राज्याचे सार्वजनिक व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे पदाधिकारी सत्ता सांभाळत आहेत. असे असताना शहरात ऐन हिवाळ्यात पाणीटंचाई भासत असल्याने मोर्चेकऱ्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, काही तांत्रिक कारणास्तव पाणीपुरवठा यंत्रणेत व्यत्यय निर्माण झाल्याने ही स्थिती उद्भवली आहे. लवकरच शहरातील पाणीप्रश्न निकाली काढू, असे आश्वासन नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना दिले. काही महिलांनी नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाण्याची मातीची भांडी फोडून निष्क्रिय प्रशासनाचा निषेध नोंदवला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here