म. टा. प्रतिनिधी नागपूर : ढगाळ वातावरणाला कंटाळलेला विदर्भ गेल्या दोन दिवसात अचानक गारठला आहे. हवामान खात्याने विदर्भात थंडीची लाट असल्याचे ( ) जाहीर केले आहे. मंगळवारीसुद्धा ही लाट कायम राहणार आहे. दरम्यान, गोंदिया ( ) सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील सर्वाधिक थंड जिल्हा ठरला तर विदर्भातील ५ जिल्ह्यांमधील तापमान १० अंशांपेक्षा खाली गेले.

यंदा निम्मा डिसेंबर महिना ओलांडल्यानंतरही सातत्याने ढगांची हजेरी लागत होती. त्यामुळे यंदा हिवाळा जाणवणार की नाही, असा प्रश्न विदर्भवासीयांना पडला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांत पाऱ्यात चांगलीच घसरण झाली आहे. विदर्भातील गारठा वाढला आहे. नागपूकरांचे स्वेटर, मफलर, कानटोप्या बाहेर निघाल्यात. रात्री शेकोट्या पेटू लागल्यात. दरम्यान, सोमवारी गोंदिया आणि यवतमाळातसुद्धा ( ) ७ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. हे राज्यातील सर्वाधिक कमी तापमान होते. त्याखालोखाल; नागपुरात ८.४, अकोला येथे ९.६ आणि वर्धा येथे ९.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. शहरातील सोमवारचे तापमान हे यंदाच्या मोसमातील नीचांकी ठरले. गेले काही दिवस शहर व विदर्भातील वातावरण ढगाळ असल्याने तापमानात वाढ झाली होती. यंदाच्या मोसमात नागपुरातील तापमान तर १२ अंशांपेक्षा खाली गेलेच नव्हते. मात्र, बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर आता थंडी परतली आहे. मंगळवारीसुद्धा शहरातील थंडीची लाट कायम राहणार असून तापमान १० अंशांपेक्षा कमीच राहणार आहे. त्यानंतर तापमानात एक ते दोन अंशांची वाढ होऊ शकते. मात्र वातावरण कोरडेच राहणार असल्याने गारठाही कायम राहणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here