म. टा. प्रतिनिधी, पिंपरीः कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाल्याने कर्जदारांना हुलकावणी देण्यासाठी मित्राचा खून करून स्वतःचाच मृत्यू झाल्याचे भासविणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. शिवभोजन थाळी जेवणाऱ्या लोकांचे फोटो पाहून मृताची ओळख पटली आहे. हिंजवडी पोलिस आणि गुन्हे शाखा युनिट चार च्या पथकाने संयुक्त कारवाई करत मृताची ओळख पटवून आरोपीला अटक केली आहे.

मेहबूब दस्तागिर शेख (रा. राजवाडेनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संदीप पुंडलिक माईनकर (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील, गणेश बिरादार हिंजवडीचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत, निरीक्षक अजय जोगदंड उपस्थित होते.

मुंबई-बंगळुरू महामार्गावर बाणेर येथे उदनशाहवली दर्ग्याच्या मोकळ्या जागेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. या व्यक्तीला हत्याराने भोकसून ठार मारले होते. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळले होते. मृतदेह दर्ग्याच्या भिंतीजवळ टाकण्यात आले होते.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाचे शवविच्छेदन केले. दरम्यान, घटनास्थळी एक ब्लूटूथ आणि मृत व्यक्तीच्या खिशात अर्धवट जळालेली एक चिठ्ठी सापडली. त्या चिठीत दोन संपर्क क्रमांक होते. त्यावर पोलिसांनी संपर्क केला तेव्हा आठ दिवसांपूर्वी वल्लभनगर, पिंपरी येथील फिरस्त्या ने मोबाईल नंबर लिहून घेतल्याचे संबंधितांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे हिंजवडी पोलिस त्या मोबाईल धरकाला घेऊन त्या परिसरात गेले. तेव्हा तो फिरस्ता म्हणजे संदीप माईनकर हे असून, त्यांना दारूचे व्यसन होते. ते कुठेही फिरून मिळेल तिथे खाऊन कुठेही राहत होते. सध्या ते संदीप वायसीएम हॉस्पिटल जवळील शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन येथे दररोज जेवत असल्याचे समजले.

या ठिकाणी जेवायला येणाऱ्या लोकांचे फोटो काढून ठेवले जातात. त्यामुळे मृतदेह आणि माईनकर यांचा फोटो पडताळून पाहिल्यावर त्यांचाच खून केल्याचे उघड झाले. मात्र, हा खून कोणी आणि का केला हे समजत नव्हते. दरम्यान, मृतदेह मिळाल्यावर पोलिसांनी शहरातून
किती लोक या कालावधीत मृत व्यक्तीच्या वयाचे किती लोक बेपत्ता झाले याची माहिती घेतली होती. तेव्हा आरोपी शेख हा बेपत्ता असल्याचे उघड झाले. एक एक व्यक्ती पडताळून पाहत असताना आरोपी शेख याचा मोबाईल सुरू असून, तो दिल्ली येथे असल्याचे उघड झाले. मात्र, त्याला कर्ज असून त्याची दोन लग्न झाली आहेत.

माईनकर यांचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला तेव्हा आरोपी शेख याचा वावर त्या परिसरात होता हे ही तपासात उगड झाले. त्यामुळे पोलिसांनी शेख याच्या घराजवळील सीसीटीव्ही तपासले तेव्हा माईनकर आणि शेख हे एकत्र असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे एक पथक दिल्ली येथे पाठविण्यात आले. मात्र, शेख हा दिल्ली वरुन तो परत येत असलेल्या रेल्वेवर नजर ठेऊन दौंड येथून शेख याला पकडण्यात आले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याने मनीषा, रामदास, अश्रफ नावाच्या व्यक्तींकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले. ते त्याच्याकडे कर्ज परत देण्यासाठी वारंवार तगादा लावत होते. त्यांचा तगादा टाळण्यासाठी त्याने एका व्यक्तीचा खून करून तो आपलाच असल्याचे भासवून यातून सुटण्याचा डाव आखला.

त्याने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ‘मी कर्जबाजारी झालो असून मी माझा शेवट करीत आहे. माझी बॉडी ही बाणेर भागातच मिळेल’ असे लिहिले. तो स्टॅम्प पेपर स्वतःकडे ठेवला. माईनकर आणि आरोपी १५ वर्षांपूर्वी हाफकिन कंपनीत एकत्र काम करत होते. त्यानंतर दोघांनी कंपनी सोडली.

आरोपी शेख याला त्याच्या कटासाठी सावज हवे होते. माईनकर कुठेही फिरून जीवन जगतात. त्यांच्याबाबत विचारणारे कोणी नाही, त्यामुळे शेख याने माईनकर यांची निवड केली.

२८ नोव्हेंबर ला सायंकाळी शेख आणि माईनकर हाफकिन कंपनीच्या बाहेर भेटले. त्याने १५ वर्षांपूर्वीचा मित्र असलेल्या माईनकर यांना त्याच्या वाकड येथील घरी नेले. घरी दोघांनी चहा घेतला. त्यानंतर शेख आणि माईनकर दुचाकीवरून बाणेरच्या दिशेने निघाले. त्यावेळी शेख याने त्याच्यासोबत बॅग घेतली. शेख याने माईनकर यांना ठार मारले. मृतदेह अर्धवट जाळला आणि दर्ग्याच्या भिंतीजवळ टाकून दुसऱ्या पत्नीसोबत पळ काढला.

सुरुवातीला शेख आणि त्याची पत्नी चार दिवस अजमेर येथे राहिले. त्यानंतर दिल्ली येथे काही दिवस राहिले. तिथून त्यांनी पुन्हा पुण्याकडे प्रस्थान केले. दरम्यान पोलिसांनी त्यांचा माग काढून दोघांना दौंड येथे गाठले. मृतदेहाजवळ सापडलेले ब्ल्यूटूथ आरोपीच्या मोबाईल फोनला कनेक्ट केले असता ते लगेच कनेक्ट झाले. तसेच त्या ब्ल्यूटूथचा चार्जर त्याच्या बॅगमध्ये सापडला. पोलिसांनी आरोपी शेख याला अटक केली आहे.

सहाय्यक निरीक्षक उद्धव खाडे, सागर काटे, कर्मचारी बंडू मारणे, किरण पवार, महेश वायबसे, अतिक शेख, हनुमंत कुंभार, कुणाल शिंदे, गणेश शिंदे, विजय घाडगे, रितेश कोळी, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, श्रीकांत चव्हाण, अमर राणे, सुभाष गुरव, दत्तात्रय शिंदे, झनक गुमलाडू, गुन्हे शाखा युनिट चारचे निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक निरीक्षक अंबरीश देशमुख, कर्मचारी अजिनाथ ओंबासे, गोविंद चव्हाण, मोहम्मद नदाफ, प्रवीण दळे, तसेच तांत्रिक विभागाचे अंमलदार सुभाष गुरव, प्रशांत सईद, शंकर चिंचकर, माळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here