म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी ( ) आरक्षणाची सोडत जाहीर ( election ) झाली आणि अनेकांच्या राजकीय भवितव्याला ब्रेक लागला. यामध्ये अनेक माजी महापौरासह पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. हक्काचा प्रभाग आरक्षित झाल्याने यांना नव्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. दरम्यान, अनेकांना हवे तसे आरक्षण पडल्याने त्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. फेब्रुवारी महिन्यातच या निवडणुकीचा धुरळा उडण्याची दाट शक्यता आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाची मुदत नोव्हेंबरमध्येच संपली आहे. सध्या महापालिकेवर प्रशासक आहे. नवीन सभागृहासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रारूप प्रभाग आराखडा तयार झाल्यानंतर प्रभाग आरक्षणासाठी सोमवारी सोडत घेण्यात आले. केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या या सोडतीनंतर अनेकांचे चेहरे खुलले तर काहीजण नाराज होऊन घरी परतले.

आरक्षण सोडतीनंतर माजी सभापती सत्यजित कदम, आशिष ढवळे, माजी उपमहापौर विलास वास्कर, सुनिल पाटील, राहूल चव्हाण यांच्यासह अनेकांना त्यांच्या हक्काच्या प्रभागात निवडणूक लढवणे अशक्य झाले आहे. माजी सभापती सारंगधर देशमुख यांनाही नवीन मतदारसंघ शोधावा लागणार आहे.

एकेका प्रभागातून तीन चार वेळा निवडून आलेल्या काही माजी नगरसेवकांना आता निवडणुकीच्या तोंडावर नवीन मतदारसंघ शोधावा लागणार आहे. पण या सोडतीत आरक्षणाच्या फटक्यातून अदिल फरास, मुरलीधर जाधव, प्रकाश गवंडी, नंदकुमार मोरे असे अनेकजण वाचले आहेत.

आरक्षण जाहीर होताच दुपारनंतर राजकीय हालचालींना वेग आला. आरक्षणानुसार ताकदीच्या उमेदवारांचा पक्षाच्या नेत्यांनी शोध सुरू केला आहे. महापालिकेचे राजकारण हेच ध्येय मानून कार्यरत असणाऱ्या काहींनी दुपारनंतर सोयीचा प्रभाग मिळतो याची चाचपणी सुरू केली आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरूध्द भाजप व ताराराणी आघाडी यांच्यातच होणार आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष स्वतंत्र लढणार असून काही मतदारसंघात त्यांची छुपी युती असणार आहे.

आरक्षण जाहीर झाल्यानंतर ४ जानेवारीपर्यंत यावर हरकत घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर अंतिम आरक्षण जाहीर करण्यात येईल. सध्याचे राजकीय चित्र पाहता मतदानाची तारीख फेब्रुवारी महिन्यातीलच असण्याची दाट शक्यता आहे. यामुळे तयारीला केवळ दोन महिने तर प्रचाराला केवळ पंधरा दिवसच मिळण्याची चिन्हे आहेत. कमी कालावधी असल्याने राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे.

या दिग्गजांना बसला आरक्षणाचा दणका

सत्यजीत कदम, आशिष ढवळे, प्रकाश नाईकनवरे, विलास वास्कर, किरण शिराळे, सुनिल पाटील, राजसिंह शेळके, संजय मोहिते, राहूल चव्हाण, राहूल माने, राजाराम गायकवाड, सारंगधर देशमुख, विजय सूर्यवंशी, महेश सावंत, संदीप कवाळे , राजू दिंडोर्ले

या दिग्गजांचा मार्ग मोकळा

अदिल फरास, राजू लाटकर, सूरमंजिरी लाटकर, प्रकाश गवंडी, नंदकुमार मोरे, रविकिरण इंगवले, मुरलीधर जाधव, डॉ. संदीप नेजदार,संभाजी जाधव,इश्वर परमार, निलोफर आजरेकर, इंद्रजित बोंद्रे

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here