जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राच्या वतीने पहिल्यांदाच जिल्ह्यात उभयचर प्राणी सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. निसर्ग अभ्यासक शिक्षक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाने आयोजित केलेल्या या उपक्रमात ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पाणथळ ठिकाणी तसेच आपल्या परिसरात आढळणार्या बेडकांची छायाचित्रे संकलित केली गेली.
या सर्वेक्षणात जिल्हाभरातील सुमारे २५ निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला, तर वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे ३१ पेक्षा अधिक प्रजातींच्या बेडकांची नोंद झाली. या उपक्रमात आढळुन आलेल्या बेडकांची अचूक ओळख पटवण्याचे व त्यांच्याबाबत अधिक सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्याचे कार्य राज्यातील सुप्रसिद्ध उभयचर प्राणी अभ्यासक डॉ. वरद गिरी व प्राणीशास्त्रज्ज्ञ डॉ. सुमन पवार यांनी केले.
या सर्वेक्षण उपक्रमात आशा कसबे यांनी घेतलेली बलुन फ्रॉगची नोंद, भट्टीवाडी(करंजी) येथील शालेय विद्यार्थ्यांनी घेतलेली फन्गॉईड व देशातील सर्वात मोठ्या आकाराच्या इंडियन बुलफ्रॉची नोंद, रविंद्र गोल्हार यांनी घेतलेली कॉमन ट्री फ्रॉगची नोंद, तसेच स्नेहा ढाकणे यांनी घेतलेली राईस फ्रॉगची नोंद अशा नोंदी या सर्वेक्षणातील वैशिष्ट्यपूर्ण व महत्वाच्या ठरल्या. असा हा आगळावेगळा उपक्रम राज्यातील पहिलाच ठरला असून, निसर्गप्रेमी व अभ्यासक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या उपक्रमासाठी जिल्हा उपवन संरक्षक अधिकारी आदर्श रेड्डी यांचेही सहकार्य मिळाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times