स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील जाधव, भास्कर जाधव सोमवारी गणेशपुरी-मुरबाड उप विभागामध्ये गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना सावदनाक्यावरून पिसा धरणाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर दोघे कारमध्ये संशयास्पदरीत्या बसल्याचे दिसले. या संशयितांना पळून जाण्याची संधी न देता तात्काळ ताब्यात घेतले. जाहीद मोहम्मद हनीफ शेख आणि ईश्वर रघुवीर मिश्रा (३९) अशी या आरोपींची नावे आहेत. यावेळी कारच्या डिक्कीमधून १ किलो ७० ग्रॅम ब्राऊन शुगर पावडर आणि १ किलो ७०० ग्रॅम एमडी पावडर तसेच एक डिजिटल वजन काटा असा एकूण १ कोटी १३ लाख ७९ हजार ५०० रुपायांचा माल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना २६ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. आरोपींकडे अंमली पदार्थ आले कोठून किंवा कोणाला विक्री करणार होते ? याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. ३० वर्षाचा जाहीद भिवंडीमध्येच राहत असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी हत्या तसेच अन्य देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिली. ईश्वर हा मुळचा उत्तरप्रदेशचा असून त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का? याबाबत माहिती घेण्याचे काम सुरु आहे. दोघेही सोबत राहत असल्याचे जाधव यांनी सांगितले. आरोपी अंमली पदार्थांची विक्री करणार होते, असेही चौकशीमध्ये समोर आले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times