म. टा. प्रतिनिधी, मुंबई: केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांवर लादलेले तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी मंगळवारी मुंबईत मोर्चा काढला. पण हा मोर्चा वांद्रे-कुर्ला संकुलातील अदानी आणि रिलायन्स कंपनीच्या कार्यालयावर पोहोचू शकला नाही. हा मोर्चा पोलिसांनी अडविल्यामुळे हे अदानी-अंबानींचे राखणदार आहे काय, असा संतप्त सवाल स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईतील वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयापासून सकाळी ११ वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात सुमारे आठ हजार शेतकरी होते, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेतकरी कामगार पक्षाचे आ. जयंत पाटील, कष्टकरी सभेचे काँ. किशोर ढमाले, लोकभारतीचे आ. कपिल पाटील, हमाल पंचायतचे नेते डॉ. बाबा आढाव, नंदुरबार भागातील सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे आदी नेते मोर्चात सहभागी झाले होते.

या मोर्चात मोदी-अदानी मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या जात होत्या. मोर्चा पुढे जाऊ नये यासाठी पोलिसांनी अडवणूक केली. शेवटी मोठा वाद झाल्यानंतर मोर्चा मार्गस्थ झाला. वांद्रे-कुर्ला संकुलातील गुरुनानक चौकात मोर्चा पोलिसांनी रोखला. तेथून अदानी आणि रिलायन्सच्या जिओ कंपनीचे कार्यालय जवळ होते. यावेळी शेतकऱ्यांनी जिओ कंपनीच्या सिमकार्डची रस्त्यावर होळी केली.

आम्ही दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला आहे. आमचा मोर्चा शांततेत आहे. तरी ठाकरे सरकारने इतका अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त कशासाठी ठेवला, असा सवाल शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी विचारला. प्रहार संघटनेचे अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोर्चात सामील होऊ नये म्हणून त्यांना नागपुरात रोखल्याबाबत शेट्टी यांनी नाराजी प्रकट केली. ठाकरे सरकारला अदानी-अंबानी या उद्योजकांचा इतका पुळका कशासाठी असा संतप्त सवालही शेट्टी यांनी मोर्चेकऱ्यांसमोर बोलताना केला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलक एकटे नाहीत, हे दाखवण्यासाठी मोर्चा काढल्याचे शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील म्हणाले. मोर्चाने कुणाला निवेदन दिले नाही. अदानी व रिलायन्सला एक पत्र लिहिले आहे. वाहतुकीला अडथळा होईल, म्हणून मोर्चा रोखल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले. या मोर्चामुळे वांद्रे आणि वांद्रे-कुर्ला संकुल भागातील वाहतुकीची काही काळ कोंडी झाली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here