म. टा. प्रतिनिधी, सांगली: दक्षिण महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी थंडीची लाट कायम आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांमधील पारा खाली आला. जिल्ह्यात सर्वात कमी ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर सांगलीत १२ अंशांपर्यंत पारा खाली आला. कोल्हापूर जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस तापमान असल्याने नागरिक गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.

गेल्या तीन-चार दिवसांपासून संपूर्ण राज्यात थंडीची लाट आली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह दक्षिण महाराष्ट्रातील जिल्हे गारठले आहेत. दक्षिण महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांत सातारा जिल्ह्यात सर्वात कमी ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे महाबळेश्वरपेक्षा सातारा शहरात थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाबळेश्वरमध्ये ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांगलीतही तापमानात लक्षणीय घट झाली आहे. १२ अंशांपर्यंत खालावलेला पारा आणि बोचरे वारे यामुळे हवामानात मोठा बदल जाणवत आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापुरात उबदार वातावरण आहे. गेल्या २४ तासात कोल्हापुरात १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पहाटेची आणि धुक्याचा आनंद घेण्यासाठी लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत. थंडी वाढली तरी लोकांचा उत्साह कायम असल्याने उद्याने, मैदाने, तलावांच्या परिसरात लोकांची गर्दी वाढली आहे. सकाळी गुलाबी थंडी आणि धुक्याच्या दुलईचा आनंद घेणारे लोक दिसत आहेत. गहू आणि हरभरा या पिकांसाठी वाढत्या थंडीचा फायदा होत आहे. मात्र, थंडीची तीव्रता आणखी वाढल्यास सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागांना धोका उद्भवू शकतो.

परदेशी पक्ष्यांचे आगमन

हिवाळ्यात लाखो परदेशी पक्षी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाणथळ जागांवर येतात. यात फ्लेमिंगोसह अनेक युरोपियन पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश असतो. यंदाही मोठ्या प्रमाणत परदेशी पक्षी दक्षिण महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील मायणी पक्षी अभयारण्यासह सांगली जिल्ह्यातील विटा, कडेगाव, आटपाडी परिसर आणि कोल्हापुरातील रंकाळा, कळंबा, राजाराम तलाव परिसरात परदेशी पक्षी विसावले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here