नवी दिल्ली: सध्या देशात सुरू असलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनात काही राजकीय पक्ष आणि विदेशींचा हात आहे. देशात हिंसेचं वातावरण निर्माण करण्याचा हा डाव असल्याचा आरोप योगगुरू रामदेव बाबा यांनी केला आहे.

रामदेव बाबांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान आझादीचे नारे लावले जात आहेत. ते चुकीचं आहे. हा देश प्रत्येकाचा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी देशातील नागरिकांशी या कायद्याचं काहीही घेणंदेणं नसल्याचं स्पष्ट केलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. काही लोक अल्पसंख्याकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात हिंसेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही राजकीय पक्ष आणि विदेशींचा या आंदोलनात हात आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

देशातील बेरोजगारी आणि महागाईवर काम करणं गरजेचं आहे. विरोधी पक्षानेही देशाचा फायदा पाह्यला हवा. प्रत्येक मुद्द्यावर राजकारण करण्याची गरज नाही. देशात यापूर्वी लाखो-कोटींचे घोटाळे झाले होते. परंतु, आपल्याला आता या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं, असं रामदेव यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी २०२० या वर्षासाठीचा त्यांचा अजेंडाही मांडला.

मलेशिया आणि इंडोनेशियासारख्या देशांनी भारताबाबत चुकीची विधानं केली आहेत. त्यामुळे भारत सरकारने त्यांच्याविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. आजही देशात ५० हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक विदेशी कंपन्यांची आहे, असं सांगतानाच शिक्षण, व्यापार आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपण गुलामीची शिकार होत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. देशातील जमीन आणि इतर रिसोर्स वाढवणं शक्य नाही. त्यामुळे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणं हाच एकमेव पर्याय आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here