अंटार्क्टिका : आतापर्यंत करोनाच्या संसर्गाशी दूर असलेला एकमेव खंड ठरलेल्या अंटार्क्टिकावर करोनाचा फैलाव झाला आहे. अंटार्क्टिकामधील चिलीच्या सैन्य आणि संशोधन तळावर करोनाचा विषाणू पोहचला. जनरल बर्नार्डो ओ हिंगीस रिकल्मे बेसवर ३६जणांना करोनाची लागण झाली आहे. अंटार्क्टिकावर करोनाबाधित आढळल्यामुळे आता जवळपास संपूर्ण पृथ्वीवरील भूभागांवर करोनाचा फैलाव झाला आहे.

करोनाबाधितांमध्ये २६ जण लष्करी जवान असून १० जण कंत्राटदार-कामगार आहेत. याठिकाणी काही दुरुस्तीचे काम ते करत होते. या सगळ्यांना आयसोलेट करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती गंभीर नसल्याचेही सैन्याने सांगितले. या तळावर ६० जणांच्या राहण्याची व्यवस्था असून यामध्ये शास्त्रज्ञांचाही समावेश आहे. या ठिकाणी एकूण २४ कंत्राटदार काम करत आहेत.

आतापर्यंत अंटार्क्टिकामध्ये करोनाचा फैलाव झाला नव्हता. हा जगातील एकमेव खंड होता. संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अंटार्क्टिका खंडावरील सर्व प्रकारच्या पर्यटनावर स्थगिती होती. मात्र, २७ नोव्हेंबर रोजी चिलीमधून काही वस्तू अंटार्क्टिकावर दाखल झाल्या. त्यातूनच फैलावला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ब्रिटीश अंटार्क्टिका सर्वेच्या संशोधकांनुसारे, या ठिकाणी असलेले ३८ तळ आणि हिवाळ्यादरम्यान या ठिकाणी उतरलेल्या १००० लोकांमध्ये कोणालाही संसर्गाची बाधा झाली नव्हती. मात्र, या वस्तू आल्यानंतर करोनाचा संसर्ग फैलावला. तर, दुसरीकडे चिली नौदलाने दिलेल्या माहितीनुसारे, २७ नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान अंटार्क्टिकावर गेलेल्या जहाजातील क्रू सदस्यांपैकी तिघांना करोनाची लागण झाली आहे. या जहाजावर २०८ क्रू सदस्य आहेत.

चिलीमध्ये करोनामुळे १६ हजारजणांचा मृत्यू
जगभरात करोनाच्या संसर्गामुळे १७ लाखांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. तर, चिलीमध्ये पाच लाख ८९ हजार १८९ जणांना करोनाची बाधा झाली असून १६ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here