मुंबई महापालिकेने राणीच्या बागेत पाच मजली इमारतीत हे ‘मुक्त पक्षी विहार’ दालन निर्माण केलं आहे. या पाच मजली इमारतीत एकूण सहा दालनं आहेत. हे दालन उभारण्यासाठी दोन वर्ष लागली असून त्यात विविध प्रजातींचे १०० पक्षी एकत्रित नांदणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना पक्ष्यांना जवळून न्याहाळण्याची संधी मिळणार आहे. इतर ५ दालनांमध्ये नव्यानेच आगमन झालेल्या बिबट्या, अस्वल, तरस, कोल्हा, कासव यांना ठेवण्यात येणार आहे. हे प्राणी अधिक जवळून व चांगल्या पद्धतीने बघता यावेत, यासाठी या दालनांच्या दर्शनी भागात वैशिट्यपूर्ण काच बसविण्यात आल्याने सेल्फी प्रेमींना देखील प्राण्यांसोबत फोटो काढण्याचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे लुटता येणार आहे. रविवार २६ जानेवारी रोजी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आणि पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
असे आहे मुक्त पक्षी विहार दालन
भारतात पहिल्यांदाचा उभारण्यात आलेले ‘मुक्त पक्षी विहार’ दालन हे ४४ फुट उंचीचे असून साधारणपणे ५ मजली इमारती एवढ्या उंचीचे आहे. तब्बल १८ हजार २३४ चौरस फुट क्षेत्रफळ असणाऱ्या या मुक्त पक्षी विहारात देश-विदेशातील वेगवेगळ्या प्रजातींचे व प्रामुख्याने पाणथळ जागांच्या जवळ राहणारे सुमारे १०० छोटे-मोठे पक्षी ठेवण्यात आले आहेत. बजरीगर, क्रौंच, हॅरॉननाईट, पेलीकन, करकोचा, सारस, मकाव यासारख्या विविध पक्ष्यांचा समावेश आहे. या मुक्त विहारामध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी झाडांवरती वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीची व्यवस्था असण्यासोबतच पक्ष्यांचा घरट्यांचीही काळजी घेण्यात आली आहे. याच विहारामध्ये १६ फुट उंचीवरुन वाहणारा नयनरम्य धबधबा आणि मनोहारी ओहोळ देखील आहे. या मुक्त पक्षी विहारामधील वातावरण व सभोवताल हा पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवसाशी मिळताजुळता असेल, याची काळजी घेऊन विकसित करण्यात आला आहे.
या मुक्त पक्षी विहाराचे सगळ्यात महत्त्वाचे व आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे यात असणारा ९६ मीटर लांबीचा पादचारी पूल. वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशद्वारे असणाऱ्या या पुलावरुन मुक्त पक्षी विहारात निर्धारित वेळी प्रवेश करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. ज्यामुळे पक्ष्यांना अधिक जवळून न्याहाळण्याची व त्यांचे छायाचित्रण करण्याची संधी मिळणार आहे.
बिबटे, अस्वल, तरस, कोल्हा यांची दालने
कर्नाटाकातील मंगलोर येथील प्राणिसंग्रहालयातून आणलेला बिबट्या व कोल्हा, म्हैसूर प्राणिसंग्रहालायातून आणलेला तरस, गुजरातमधील सुरत येथील प्राणिसंग्रहालयातून आणलेले अस्वल हे सुद्धा या दालनाचं वैशिष्ट्ये ठरेल आहे. मायानगरी मुंबईत नव्यानेच आलेल्या या प्राण्यांसाठी चित्रपटातील सेटही फिके वाटतील, अशी मनमोहक व भव्यदिव्य दालने उभारण्यात आली आहेत. त्या-त्या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्या अनुरुप ही दालने विकसित करण्यात आली आहेत.
या दालनांचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे हे प्राणिसंग्रहालयातील पारंपारीक पद्धतीचे गज असणारे पिंजरे नसून अतिशय उत्कृष्ट दर्जाची पारदर्शकता असलेल्या मजबूत काचेच्या भिंतींसह असणारी दालने. दालनांच्या दर्शनी बाजूला असणाऱ्या या काचेच्या भिंतींमुळे दालनात असणारे प्राणी नागरिकांना कोणत्याही अडथळ्याविना थेट बघता येऊ शकतात. तर सेल्फी प्रेमींना व छायाचित्रकारांना प्राण्यांची अधिक सुस्पष्ट छायाचित्रे ह्याठिकाणी घेता येणार आहेत.
>> दालनामध्ये असणाऱ्या प्राण्यांची ठळक वैशिष्ट्ये सांगणारे सचित्र माहिती फलक दालनाजवळ बसविण्यात आले आहे.
>> बिबट्यासाठी उभारण्यात आलेल्या दालनाचे क्षेत्रफळ २८ हजार ८७९ चौरस फूट एवढे आहे.
>> अस्वलासाठी २२ हजार ६२५ चौरस फूट, तरससाठी ९ हजार ४७२ चौरस फूट आणि कोल्ह्यासाठी ७ हजार २६५ चौरस फूट आकाराचे दालन उभारण्यात आले आहे.
कासवांसाठी स्वतंत्र दालन
या दालनाचं आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे कासवांसाठीही राणीच्या बागेत स्वतंत्र दालन उभारण्यात आलं आहे. या दालनाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन उपविभाग असणाऱ्या या या दालनात पाण्यातील कासव अर्थात ‘टर्टल’ व जमिनीवरील कासव अर्थात ‘टॉरटॉईज’ हे एकाच ठिकाणी बघता येणार आहेत. सुमारे १ हजार २३४ चौरस फूट एवढे क्षेत्रफळ असणाऱ्या या दालनात पाण्यातील कासवांसाठी एक छोटे तळे विकसित करण्यात आले आहे. तर जमिनीवरील कासवांसाठी छोटी घरटीही या ठिकाणी आहेत. या दालनाच्या दर्शनी भागाच्या भिंती देखील वैशिष्ट्यपूर्ण काचेच्या आहेत. ज्यामुळे बच्चे कंपनीला अधिक जवळून चालणाऱ्या व पोहणाऱ्या कासवांना बघता येणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Great post thank you. Hello Administ . Cami Halısı ve Cami Halıları Firmasi. Göbekli Cami Halısı