चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर मुंबई महानगर पालिकेने चिचंपोकळीतील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. या कक्षामध्ये कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांची तपासणी केली जात असून इथेच त्याच्यावर उपचारही करण्यात येणार आहेत, असे मुंबई महानगर पालिकेच्या कार्यकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.
चीन मधून मुंबईत आलेल्या या दोन संशयित रुग्णाला खोकला आणि सर्दीचा त्रास जाणवत होता. यामुळे त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याचे डॉ. केसकर यांनी सांगितले. चीनहून मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोना व्हायरलची काही लक्षणे आढळल्यास त्यांना कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्याच्या सूचना विमानतळावरील डॉक्टरांना करण्यात आल्या असल्याचेही केसकर म्हणाल्या.
महाराष्ट्र सरकारकडून कस्तुरबा रुग्णालयाला कोरोना व्हायरससंबंधित रुग्णांना हाताळण्याविषयी सूचना करण्यात आल्या असून, त्या तंतोतंत पाळण्यात याव्यात असे राज्य सरकारने कस्तुरबा हॉस्पिटलला सांगितले आहे.
कोरोना व्हायरसची लागण झाल्याने आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसची लागण झाल्यानंतर ताप येणे, खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास जाणवणे अशी लक्षणे आढळत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times