म. टा. प्रतिनिधी, सांगली: ‘राज्यात महाविकास आघाडी सरकारचा कारभार म्हणजे काँग्रेसच्या हातावर तुरी आणि राष्ट्रवादी, शिवसेनेची वाटमारी असा प्रकार सुरू आहे. कृषी विधेयकांवरून शेतकऱ्यांना भ्रमित केले जात आहे. हिम्मत असेल तर राज्य सरकारने कृषी कायदे रद्द करून दाखवावेत,’ असे आव्हान भाजपचे नेते यांनी राज्य सरकारला दिले. व रयत क्रांती संघटनेच्या वतीने गुरुवारी येडेमच्छिंद्र (जि. सांगली) येथून किसान आत्मनिर्भर यात्रेला सुरुवात झाली. यावेळी शेलार बोलत होते.

कृषी विधेयकांना सुरू असलेल्या विरोधाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप व रयत क्रांती संघटनेकडून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात किसान आत्मनिर्भर यात्रा काढली जात आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या येडेमच्छिंद्र या गावातून किसान आत्मनिर्भर यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यावेळी बोलताना भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले, ‘केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरून शेतकऱ्यांना भ्रमित केले जात आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे जसे काही महायुद्ध सुरू झाले की काय, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांच्याच विचारांचे काम केले. दलाल, अडते यांच्या गुलामगिरीतून शेतकऱ्यांना मुक्त केले. याउलट आतापर्यंत ज्यांनी फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेतले त्यांनीच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधात काम केले. हिंमत असेल तर केंद्र सरकारने लागू केलेली कृषी विधेयके राज्य सरकारने रद्द करून दाखवावेत.’

महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करताना शेलार म्हणाले, ‘राज्यात सध्या काँग्रेसच्या हातावर तुरी आणि राष्ट्रवादी, शिवसेनेची वाटमारी असा प्रकार सुरू आहे. सध्या सर्वात जास्त लक्ष्मीदर्शन महाविकास आघाडीच्या नेत्यांना होत आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवू न शकलेल्या राज्यातील आघाडी सरकारला उशिरा का होईना शहाणपण आले आहे. आम्ही त्याचे स्वागत करीत आहोत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचे फायदे मिळावेत, ही आमची मागणी होती. मात्र, इतके दिवस हा निर्णय घ्यायला राज्य सरकारला वेळ का लागला? त्यामुळे अख्ख्या वर्षाचे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, याचेही उत्तर राज्य सरकारने द्यावे.’ रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांनी किसान आत्मनिर्भर यात्रेचा उद्देश स्पष्ट केला. ही यात्रा चार दिवस कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रबोधन करणार आहे. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर, सम्राट महाडिक, आदी उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here