नवी दिल्ली : मराठमोळा माजी क्रिकेटपटू अजित आगरकर हा भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष होऊ शकतो, असे चित्र दिसत होते. पण निवड समितीमध्ये आगरकरची निवड करण्यात आली नसून या निर्णयाने काही जणांना धक्का बसला आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने आज तीन निवड समिती सदस्यांची निवड केली आहे आणि त्यामध्ये सर्वाधिक सामने खेळलेल्या आगकरचीच निवड करण्यात आलेली नाही.

भारतीय संघाच्या निवड समितीसाठी आगरकरबरोबरच चेतन शर्मा, मनिंदर सिंग, अॅबी कुरुविल्ला, शिवसुंदर दास, देबाशिष मोहंती, रणदेब बोस, नयन मोंगिया, विजय दाहिया यांनी अर्ज केले होते. यामधून पाच माजी क्रिकेटपटूंची निवड बीसीसीआयची क्रिकेट सल्लागार समितीने केली होती. त्यानंतर या पाच जणांमधून तीन माजी क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली. या तीन माजी क्रिकेटपटूंमध्ये निवड समितीचे अध्यक्षपद मिळू शकणाऱ्या आगरकरचा समावेश मात्र करण्यात आलेला नाही.

बीसीसीआयने आज एक पत्रक जाहीर केले आहे. यामध्ये बीसीसीआयने म्हटले आहे की, ” भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल, आर.पी. सिंग आणि सुलक्षणा नाईक यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने आज निवड समिती सदस्यांची घोषणा केली आहे. यावेळी तीन माजी क्रिकेटपटूंना निवड समितीमध्ये निवडण्यात आले आहे. यामध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा, अॅबी कुरुविल्ला आणि देबाशिष मोहंती यांची निवड करण्यात आली आहे. चेतन शर्मा यांच्याकडे निवड समितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. ही निवड एका वर्षासाठी करण्यात आली आहे.”

सल्लागार समितीने यावेळी पाच जणांमधून तिघांची निवड केली आहे. कारण यापूर्वी माजी क्रिकेटपटू सुनील जोशी आणि हरविंदर सिंग यांची निवड करण्यात आली आहे. सल्लागार समितीने ज्या पाच खेळाडूंची निवड केली होती त्यामध्ये सर्वाधिक सामने हे अजित आगरकरच्या नावावर होते. त्यामुळे आगरकरची निवड करण्यात का आली नाही, हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडेलला आहे. याबाबत सल्लागार समिती काही खुलासा करणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here