प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आजच्या बंदची माहिती दिली. एनसीआर आणि सीएए विरोधातील वंचितच्या या बंदला राज्यातील जनतेने चांगला प्रतिसाद दिला. सकाळपासूनच राज्यभरातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. ठाण्याच्या तीन हात नाका येथेही रास्तारोको करत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राज्यातील औरंगाबाद, बारामती, मनमाड, वाडा, पालघर, जालना, हिंगोली, परभणी, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, इंदापूर, गोंदिया, बीड, केज, गडचिरोली आणि चंद्रपूर या भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला असून आम्हाला बंदच्या माध्यमातून जो संदेश देशातील जनतेला द्यायचा होता, तो लोकांपर्यंत पोहोचल्याचा दावा, आंबेडकरांनी केला. या बंदला राज्यातील जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आंबेडकर यांनी जनतेचे आभारही मानले.
या बंदला राज्यातील शंभरहून अधिक संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळेही बंदचा परिणाम अधिक जाणवल्याचं आंबेडकरांनी सांगितलं. मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला असूनही या ठिकाणी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. मुलुंड स्टेशन परिसरात कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. मुंबईत विक्रोळी असल्फा व्हिलेज, वरळी, कुर्ला, भायखळा, चेंबूर, गोरेगाव आदी भागातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनीही स्वत:हून बंदला पाठिंबा देऊन सहकार्य केल्याचंही ते म्हणाले.
बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, असा आम्ही शब्द दिला होता. आमचा शब्द आम्ही पाळला. मुंबीत एका बेस्ट बसवर दगडफेक करण्यात आली. चेहरा झाकून एका व्यक्तिने ही दगडफेक केली. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी चेहरे झाकून बंदमध्ये भाग घेतला नव्हता. चेहरे झाकून आंदोनल करणारे कार्यकर्ते आमचे नाहीत आणि ती आमची पद्धतही नाही, असंही ते म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times