लंडन : ब्रेग्झिट पश्चात मुक्त व्यापार करार करण्यात ब्रिटन आणि युरोपीय समुदायाला गुरुवारी यश आले. हा करार करण्याची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपत होती. दोन हजार पानांच्या या कराराचा तपशील आगामी काही दिवसांत उपलब्ध होण्याची शक्यता असून, दोन्ही बाजूंच्या संसदेने त्यास मंजुरी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करता येणार आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात करार झाल्याची घोषणा केली.

‘दोन्ही बाजूंनी मुक्त व्यापार करारावर सही केली असून, हा करार शून्य दरावर आणि शून्य कोट्यावर आधारित आहे. २०१९ मध्ये झालेल्या ६६८ अब्ज पौंड व्यापाराचा हा करार आहे. ब्रिटनने चलन, सीमा, कायदे, व्यापार आणि सागरी वाहतुकीचे नियंत्रण परत मिळवले आहे,’असे ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने म्हटले.

वाचा:

ब्रिटन आता जानेवारीत अधिकृतपणे युरोपीय समुदायातून बाहेर पडणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ब्रिटन अधिकृतपणे युरोपीय समुदायात असेल. युरोपीय समुदायातून बाहेर पडणारा ब्रिटन हा पहिला देश ठरला आहे. दोन हजार पानांचा हा करार ब्रिटनच्या समुद्रात युरोपीय मच्छिमारांना प्रवेश देण्यावरून संकटात आला होता. अखेर युरोपीय मच्छिमारांना प्रवेश देण्यास ब्रिटनने मान्यता दिल्यानंतर या करारावर सह्या करण्यात आल्या. आयर्लंडच्या पंतप्रधानांनीही या कराराचे स्वागत केले आहे.

वाचा:

भारतावर परिणाम काय होणार?

ब्रेग्झिट व्यापार करारानंतर ब्रिटनसह भारताचा मुक्त व्यापार करार होऊ शकतो. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार वाढण्यास मदत होणार आहे. ब्रिटन एक लहान देश असला तरी एक मध्यवर्ती बाजारपेठ आहे. पोर्तुगाल, ग्रीससारखे देश ब्रिटनमधून वस्तू घेतात. त्यामुळे भारताला मोठी संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

‘या’ क्षेत्रांना होणार फायदा

ब्रिटन युरोपीयन युनियनपासून वेगळा झाल्याने भारताला फायदा होणार आहे. बँक ऑफ अमेरिकेच्या एका अहवालानुसार, ब्रिटन आणि युरोपीयन युनियन या दोघांना ब्रेग्झिटच्या प्रक्रियेत नुकसान होऊ शकते. तर, भारत उत्पादन आणि सेवा क्षेत्राबाबत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, संरक्षण आणि आर्थिक क्षेत्राच्या दृष्टीने भारताला फायदा होऊ शकतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here