कोल्हापूर : तब्बल २१५ वर्षापूर्वी प्रथमच देवनागरी भाषेत मुद्रित झालेल्या आणि जगात एकमेव असलेल्या पहिल्या भगवद्गीतेची प्रत सध्या मिरजेत उपलब्ध आहे. भारतीय मुद्रण कलेचा अमूल्य ठेवा असणाऱ्या या ग्रंथाच्या अभ्यासासाठी विदेशातील अभ्यासक मिरजेला भेट देतात. इतिहास संशोधन मंडळाकडे असलेली ही दुर्मिळ प्रत यापुढेही वर्षानुवर्षे जपण्याची गरज आहे.

कुरूक्षेत्रावर कौरव-पांडवांमध्ये जे युद्ध झाले, त्यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला जी गीता सांगितली, ती म्हणजे जीवनाचे सार आहे. जीवन कसे जगावे हेच यामध्ये सांगितल्याने ही तिला अतिशय महत्त्व आहे. पूर्वीच्या काळात ही गीता हस्तलिखीत स्वरूपात होती. नंतर मुद्रणकलेचा शोध लागल्यानंतर ती अनेक भाषेत मुद्रित झाली. पूर्वी रोमन लिपीत असणारी ही गीता १८०५ मध्ये देवनागरी भाषेत मुद्रित झाली. पहिली देवनागरी भाषेतील मुद्रित गीतेची प्रत मिरजेत असून त्याला तब्बल २१५ वर्षे झाली आहेत. गीता जयंतीच्या निमित्ताने त्याच्या इतिहासाला उजाळा मिळाला आहे.

पुण्यात सवाई माधवरावाच्या दरबारात असणारे इंग्रज वकील चार्लस् मॅलेज याने नाना फडणवीस यांच्या सहकार्याने गीता देवनागरी भाषेत मुद्रित करण्याचा प्रयत्न केला. पण अचानक फडणवीस यांचा मृत्यू झाल्याने त्याला खो बसला. याची माहिती मिरजेचे तत्कालीन संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन यांना कळाले. त्यांनी मग मॅलेज यांच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचाच एक भाग म्ह्णून त्यांनी मॅलेट याने ज्या तांबट करागिराला तांब्याच्या पत्र्यावर मुद्रण करण्यास शिकविले होते. त्यालाच मिरजेला बोलावून घेतले. त्याच्याकडून तांब्याच्या पत्र्यावर कोरून घेतली. त्यानंतर त्याच्या सुमारे शंभर प्रती मुद्रित करून घेतल्या. त्यातीलच एक प्रत सध्या मिरज संशोधन मंडळाकडे उपलब्ध आहे.

ही गीता १६६ पानांची असून शेवटच्या पानावर मुद्रणाच्या स्थळ काळाचा उल्लेख केला आहे. मिरजेचा उल्लेख ‘मार्कंडेय मुनीक्षेत्रे’ असा केला असून ‘शके १७२७, क्रोधननाम संवत्सरे’ असा कालोल्लेख आहे. शके १७२७ म्हणजे इसवी सन १८०५ होते. दोनशे वर्षापेक्षा अधिक काळ हा अमूल्य ठेवा मिरजेत जपून ठेवला आहे. शंभरपैकी आता ही केवळ एकच प्रत शिल्लक आहे. त्यामुळे यापुढेही वर्षानुवर्षे हा ठेवा जपून ठेवण्याची गरज आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here