मुंबई : कृषी कायद्याविरोधात हल्लाबोल करत राजधानी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनानं आज तब्बल ३० दिवस पूर्ण केलेत. महिन्याभरापासून हे आंदोलक सीमेवर बसलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांवर हल्ला करतानाच शेतकऱ्यांना भडकावण्यात आल्याचा आरोप केला. यानंतर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ”च्या अग्रलेखात देशातील सगळ्या विरोधी पक्षांना ‘मरतुकड्या’ म्हणून हिणवतानाच ‘एकत्र येण्याची गरज’ व्यक्त केलीय.

‘हे सगळं लोकशाहीला मारक’

‘सगळे भाजपविरोधक यूपीएत सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाहीत. प्रियंका गांधी यांना दिल्लीच्या रस्त्यावर अटक होते. राहुल गांधी यांची चेष्टा होते. ममता बॅनर्जींची कोंडी होते, महाराष्ट्रात ठाकरे सरकारला काम करू दिले जात नाही. हे सर्व लोकशाहीला मारक आहे. त्याला जबाबदार कोण? मरतुकड्या अवस्थेत पडून राहिलेला विरोधी पक्ष!’ असं म्हणत सामनाच्या अग्रलेखात मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

‘विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे. या पाटीलकीला कोणी गांभीर्याने घेत नाही. म्हणून ३० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी निर्णायकी अवस्थेत बसला आहे. ओसाड गावची डागडुजी तत्काळ करावीच लागेल’ असं म्हणत ‘सामना’च्या अग्रलेखातून विरोधकांच्या कमकुवतपणावरही ताशेरे ओढण्यात आलेत.

काँग्रेसला सल्ला

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला आणि विरोधकांना सत्ताधाऱ्यांनी न जुमाननं याचं कारण ‘निपचित पडलेला विरोधी पक्ष’ असल्याचं अग्रलेखातून विरोधकांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

गुरुवारी, काँग्रेस खासदार राहुल गांधी आपल्या काही खासदारांसोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शेतकरी आंदोलना संदर्भात एक निवेदन देण्यासाठी निघालेले पक्षाकडून एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु, या मोर्चाला पोलिसांनी रस्त्यातच अडवत प्रियंका गांधी यांना काही कार्यकर्त्यांसहीत ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आलं होतं. यावरच शिवसेनेकडून भाष्य करण्यात आलं.

‘राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर भाजपतर्फे त्यांची खिल्ली उडवण्यात आली. राहुल गांधींच्या विधानांना काँग्रेसही गांभीर्याने घेत नाही, असं कृषी मंत्री नरेंद्र तोमर म्हणाले. आपल्या सर्वोच्च नेत्यांची अशी जाहीर चेष्टा करणाचे धारिष्ट सत्ताधारी का दाखवतात यावर काँग्रेसने वर्किंग कमिटीत चर्चा करणे गरजेचे आहे’ असं म्हणताना शिवसेनेनं काँग्रेसवरही निशाणा साधलाय.

”चं नेतृत्व करणार?

‘काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एक यूपीए नामक राजकीय संघटन आहे. त्य यूपीएची अवस्था एखाद्या एनजीओप्रमाणे झाल्याचे दिसत आहे. यूपीएमध्ये काही पक्ष असावेत. पण ते नक्की कोण व काय करतात, याबाबत संभ्रम आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला तर यूपीएतील इतर घटक पक्षांची साधी सळसळही जाणवत नाही. शरद पवार यांचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व राष्ट्रीय पातळीवर आहेच व त्यांच्या भारदस्त व्यक्तीमत्वाचा आणि अनुभवाचा फायदा पंतप्रधान मोदींपासून इतर सगळेच पक्ष घेत असताात’ असं म्हणत या अग्रलेखात शरद पवार यांच्या नेतृत्वाचं कौतुक करण्यात आलंय.

सोबतच, पश्चिम बंगालमध्ये जे काम काँग्रेसनं करायला हवं ते शरद पवार करत आहेत, असं म्हणतानाच पश्चिम बंगालमध्ये शरद पवार यांनी ममतांना पाठिंबा दर्शवला आहे, असंही ‘सामना’च्या अग्रलेखात अधोरेखित करण्यात आलं आहे. त्यामुळे, विरोधी पक्षांच्या ‘यूपीए’चं नेतृत्व शरद पवार यांनी करावं असं तर शिवसेनेला सूचवायचं नाही ना? यावर आता चर्चा सुरु झालीय.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here